वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

By admin | Published: December 2, 2015 04:28 AM2015-12-02T04:28:59+5:302015-12-02T04:28:59+5:30

असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील

Increasing intolerance to infamy! | वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

Next

नवी दिल्ली : असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील चर्चेचा समारोप केला. भारत हा सहिष्णू होता आणि भविष्यातही तो तसाच राहील. वाढती असहिष्णुता हा केवळ सरकारला बदनाम करण्यास रचण्यात आलेला ‘बनाव’ आहे. सामाजिक व धार्मिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा सडेतोड इशारा गृहमंत्र्यांनी दिला. आम्ही असहिष्णू आहोत; पण ही असहिष्णुता भ्रष्टाचाराविषयी, अस्वच्छ परिसराविषयी, दहशतवादाविषयी आणि महिलांवरील अत्याचार व तत्सम विषयांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात असहिष्णुतेचे सर्वांत मोठे शिकार कुणी ठरले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपा आहे, अशा शब्दांत भाषणाला सुरुवात करून राजनाथ सिंह म्हणाले, साहित्यिक, बुद्धिजीवी व कलावंतांना देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे वाटत असेल तर एकत्र बसून चर्चा होऊ शकते. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आम्ही कुठे चुकत असू तर ती चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ शकता.
असहिष्णुतेच्या नावावर कागदी आणि बनावटी तोफगोळे डागले जात आहेत. विरोधी पक्षांचे असहिष्णुतेचे आरोप सरकारवर नाहीत तर समाज व राष्ट्रावर केलेले आरोप आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या का, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

वाचाळांना संयमाचे फर्मान
लोकसभेत विरोधक सरकारवर तुटून पडलेले असताना भाजपा संसदीय पक्षाची या अधिवेशनात प्रथमच बैठक झाली व त्यात चिथावणीखोर वक्तव्ये करू नका, संयम पाळा अशा सूचना पक्षाने आपल्या खासदारांना दिल्या.

निषेध करणे हा राष्ट्रद्रोह; राहुल गांधींचा हल्ला
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचा आरोप करीत, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रखर टीका केली. सहिष्णुता आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. त्यामुळेच लोकांचा आवाज दडपणाऱ्या ‘असहिष्णू’ पाकिस्तानचा धडा गिरवण्याऐवजी सरकारने देशातील जनतेचा आवाज ऐकावा, असा टोला राहुल यांनी लगावला.
निषेधाचे, विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. देशातील बुद्धिजीवी, साहित्यिक देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करीत आहेत. आपले पुरस्कार परत करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले जात आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकची दुर्बलता आहे. त्यामुळेच पाकचा धडा गिरवू नका तर लोकांचा आवाज ऐका, त्यांना जवळ करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्या मताचा आदर करा. सरकार स्तरावरील विरोधाभास दिसतो आहे. कदाचित पंतप्रधानांना तो दिसत नसावा, असे राहुल म्हणाले.

मोदी विदेशात जातात, संरक्षण क्षेत्रात एफडीआयच्या गोष्टी करतात; पण दादरीत हवाई दलात असलेल्या एका जवानाचा पिता मोहम्मद अखलाक मारला जातो. दोन दलित मुलांना जिवंत जाळले जाते. यावर आपले पंतप्रधान अवाक्षरही बोलत नाहीत. पंतप्रधान कौशल्य विकासाच्याही गप्पा करतात. पण एफटीआयआयचे विद्यार्थी त्यांच्यावर थोपण्यात येणाऱ्या एका व्यक्तीचा विरोध करतात, तेव्हा या कौशल्यनिपुण विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकणे पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत नाही. मोदीजी गुजरात मॉडेल आणि गुजरात शायनिंगच्याही बाता मारतात. मात्र पाटीदार आंदोलनाने गुजरातच्या विकासाचा फुगा कधीचाच फुटला आहे, असेही ते म्हणाले.

विरोधकांचा सभात्याग
काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचे राजनाथसिंह यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. गृहमंत्री देशातील घटनांवर बोलण्यापेक्षा परदेशातील उदाहरणे देत आहेत, असे सांगत काँग्रेस व अन्य सदस्यांनी सभात्याग केला.

Web Title: Increasing intolerance to infamy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.