सेक्स चेंज ऑपरेशन करुन घेणा-यांची वाढली संख्या
By Admin | Published: July 17, 2017 11:26 AM2017-07-17T11:26:40+5:302017-07-17T11:34:10+5:30
शस्त्रक्रियेव्दारे लिंग बदल करुन घेणे सहज शक्य झाल्यानंतर आता अशा प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - शस्त्रक्रियेव्दारे लिंग बदल करुन घेणे सहज शक्य झाल्यानंतर आता अशा प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मध्य दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी वेटिंग लिस्ट बनवावी लागली असून, पाच जण या शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. हा आकडा मोठा नसला तरी, दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा शस्त्रक्रियांकडे पाहण्याचा समाजाचा संकुचित दृष्टीकोन हळूहळू बदलत चालला असून, शहरांमध्ये मागणी वाढू लागली आहे.
दोन अभियंते आणि वैद्यक शाखेच्या एक विद्यार्थ्याचा प्रतिक्षायादीमध्ये समावेश आहे. रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. पी.एस.भंडारी यांनी हा आकडा आश्चर्यकारक नसल्याचे सांगितले. अशा शस्त्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती बहुतांश मध्यमवर्गातील असल्याचे त्यांनी सांगितले. दहावर्षांपूर्वी एखाद-दुसरा रुग्ण ही शस्त्रक्रिया करुन घ्यायचे पण आता महिन्याला तीन ते चार रुग्ण ही शस्त्रक्रिया करुन घेत आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.
आणखी वाचा
नोएडा येथे रहाणारी 27 वर्षीय तरुणी मुलगी म्हणून जन्माला आली पण तिला लहानपणापासूनच फ्रॅाक घालायला, बाहुलीबरोबर खेळयला अजिबात आवडत नसे. मुलगी असूनही तिच्यामध्ये मुलांप्रमाणे भावना होत्या. तिचे आई-वडीलही तिच्यातील हे बदल स्वीकारायला तयार नव्हते. या सर्वाचा परिणाम होऊन ती नैराश्यामध्ये गेली. तीन वर्षांपूर्वी झोपेच्या गोळयांचा जास्त डोस घेऊन तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. तिला दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले त्यावेळी विविध तपासण्यांमधून ती नैराश्याचा सामना करत असल्याचे समजले.
मद्य, सिगारेटच्या व्यसनामध्ये तिने स्वत:ला बुडवून घेतले होते. स्त्रीचे शरीर असूनही आपल्यात एक मुलगा दडला आहे असे तिचे म्हणणे होते. डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना तिची शारीरीक आणि मानसिक अवस्था समजावून सांगितल्यानंतर पालकांनी तिला मुलाप्रमाणे रहाण्यास संमती दिली. त्यानंतर काही महिन्यांनी मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली. आता मनासारखे आयुष्य जगायला मिळत असल्याने ती समाधानी आहे. आता अशा घटनांकडे पाहण्याचा समाजाचा दुष्टीकोन हळूहळू बदलत चालला आहे तसेच शस्त्रक्रियाही अवाक्यात आल्याने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेणा-यांची संख्या वाढत आहे.