Independence Day 2021 : मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले : पंतप्रधान नरेंद्र माेदी; ७५वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:11 AM2021-08-16T06:11:06+5:302021-08-16T06:11:32+5:30
Independence Day 2021 : ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.
- विकास झाडे
नवी दिल्ली : जे जुने अनावश्यक कायदे होते, ते आधीच्या सरकारला रद्द करण्यात जराही रस नव्हता. मी मात्र असे शेकडो कायदे रद्द केलेत, याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यांना 'सबका प्रयास' ची जोड दिली. ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'.
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.
ते म्हणाले, 'हीच योग्य वेळ आहे, ही भारतासाठी मौल्यवान वेळ आहे. आपल्याकडे शक्ती आहे, उठा आणि तिरंगा लहरवा'. सर्वांच्या क्षमतेला योग्य संधी देणे, हीच लोकशाहीची खरी भावना आहे. आज सरकारी योजनांची गती वाढली आहे. आपण निर्धारित लक्ष्य साध्य करत आहोत. आता आपल्याला पूर्णत्वाकडे जायचे आहे. त्यासाठी आम्हाला आता सुरुवात करावी लागेल. आमच्याकडे गमावण्यासाठी एकही क्षण नाही. ही योग्य वेळ. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, याच श्रद्धेने आपण सगळे जमलो आहोत.
सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ड्रोनहल्ला लक्षात घेता या शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. गणतंत्रदिनी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी हिंसा झाली, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यांवर शिपिंग कंटेनरच्या भिंती उभारल्याचे सांगण्यात आले.
१०० लाख कोटींची योजना!
मोदी यांनी 'प्रधानमंत्री गति-शक्ति-योजने'ची घोषणा केली. या योजनेचे पॅकेज १०० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक असणार आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार दिला जाईल, असा त्यांना विश्वास आहे. पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी ही योजना खास असेल. सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरता येईल.
खेळाडूूंसाठी टाळ्यांचा वर्षाव!
मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय तुकड्यांची भेट घेतली. मोदींनी त्यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा, असे आवाहन केले. प्रथमच कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
काश्मिरात विकासाचा समतोल!
जम्मू असो किंवा काश्मीर तिथे आता विकासाचा समतोल दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरू आहे.
पंडित नेहरूंचा उल्लेख!
मोदी हे त्यांच्या भाषणातून नेहमी पंडित नेहरूंना टाळतात, तर सरदार पटेलांचा उल्लेख करतात. परंतु आज त्यांनी महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग यासोबतच पंडित नेहरूंच्या नावाचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वस्व त्यागणारे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल अश्फाक उल्लाह खान, राणी लक्ष्मीबाई, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे देश आज स्मरण करतो आहे. आम्ही सगळे त्यांचे कर्जदार आहोत.