Independence Day 2021 : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता....'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:45 AM2021-08-15T08:45:59+5:302021-08-15T08:48:10+5:30
Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद...
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात
शपथ घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जमले असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद :
कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे . मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो. आपण जुने ते सारे त्यागून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; आपण भारताच्या, भारतवासीयांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करीत आहोत.
इतिहासाच्या प्रारंभापासूनच भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष केला आणि यश-अपयशाच्या डोंगरदऱ्याही पार केल्या. चांगल्या आणि वाईट काळातदेखील भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही, भारताला आपल्या या शोधाचा; तसेच स्वतःला शक्ती देणाऱ्या मूल्यांचा कधीच विसर पडला नाही. एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आज संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचाच शोध लागला आहे, स्वत्वाची जाणीव होते आहे.
हे यश म्हणजे एक संधी आहे : आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक मोठ्या विजयांची आणि यशाची पहिली पायरी आहे.ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे का?- हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे.
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीदेखील येते. सार्वभौम भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटनासमितीवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याचा जन्म होण्याआधी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडलेल्या या देशाने सर्व प्रकारच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यात सुख होते, तसे दु:खा आणि क्लेशही होते! त्या आठवणींचा सल अजूनही मनाशी आहे. असो. आता तो भूतकाळ संपला आहे, आपण आपल्या भविष्यकाळाच्या दारात उभे राहिलो आहोत!
हा भावी काळ सहजसाध्य नाही, विसावा घ्यावा असाही नाही. आतापर्यंत आपण घेतलेल्या अनेक प्रतिज्ञांची पूर्तता करण्यासाठी आपलयाला अविरत झटावे लागणार आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यवधी पीडितांची सेवा. दारिद्य्र, अज्ञान, रोगराई, संधींची असमानता यांचे उच्चाटन म्हणजेच भारताची सेवा. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे ही आपल्या पिढीतील सर्वांत थोर व्यक्तीची महत्त्वाकांक्षा आहे. हे काम कदाचित आपल्या क्षमतेच्या पलीकडील असेल; परंतु जोपर्यंत दुःख आणि अश्रू असतील, तोपर्यंत आपले काम संपणार नाही.
कठोर परिश्रम घ्यावे लागतील, त्यासाठी वाट्याला येईल ते सारे सोसावे लागेल, अथक काम करावे लागेल , तरच आपण पाहिलेली सारी स्वप्ने साकार होऊ शकतील. ही स्वप्ने फक्त भारताची, भारतासाठी नाहीत; ती जगाची स्वप्ने आहेत, जगासाठी पाहिली गेलेली आहेत ! जगभरातील देश आणि या पृथ्वीवरील सारी माणसे एकमेकांशी इतकी जोडली गेलेली आहेत, की कोणा एकाला इतरांपासून विलग करता येईल, अलग राहता येईल, अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. शांती, स्वातंत्र्य, समृद्धी आणि संकटे हे सारे आजच्या अविच्छिन्न एकमय जगात अविभाज्य आहेत. इतरांपासून फुटून निघालेले, एकट्याचे असे वेगळे काही यापुढच्या जगात असणार नाही.
अवघ्या भारतविश्वातील जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत . या नात्याने मी सर्वाना आवाहन करतो, स्वातंत्र्याच्या युगात पाऊल टाकत असताना या साहसी प्रवासात श्रद्धेने आणि विश्वासाने आमच्यासोबत असा. ही वेळ क्षुद्र आणि विघातक टीकेची नाही; तसेच अनिष्ट चिंतनाची, विद्वेषाची आणि आरोप-प्रत्यारोपांचीही नाही. भारतमातेची सारी लेकरे जिथे सुखाने नांदू शकतील , अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपल्याला करायची आहे.