Independence Day 2021: मोदींचा मोठा संदेश, म्हणाले, ‘’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच आता…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:21 AM2021-08-15T09:21:00+5:302021-08-15T09:21:35+5:30
Independence Day 2021, PM Narendra Modi Speech: देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला.
नवी दिल्ली - देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला. तसेच देशवासियांना महत्त्वाचा मंत्रही दिला. ‘’आपल्या देशाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास सोबतच सबका प्रयास आवश्यक आहे’’ असा संदेश मोदींनी दिला.
देशवासियांना उद्देशून केलेल्या आपल्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या श्रद्धेने आम्ही सर्वजण एकत्र जोडले गेलो आहोत. आज मी लाल किल्ल्यावरून आवाहन करतो की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच सबका प्रयास आमच्या प्रत्येक लक्ष्याच्या प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
यावेळी मोदींनी येथून पुढच्या २५ वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच २१ व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे, असे मतही मांडले.
त्याबरोबरच आज आपण करत असलेले संकल्प देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी सिद्ध होतील. त्यावेळी या लाल किल्ल्यावरून जे कुणी पंतप्रधान भाषण करतील. ते आज आपण करत असलेल्या संकल्पांची सिद्धता झाल्याचा उल्लेख करतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.