Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 19:48 IST2022-08-15T19:43:54+5:302022-08-15T19:48:37+5:30
Independence Day 2022 : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे.

Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा
नवी दिल्ली - देशभरात जल्लोषात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील चांदामेटा गावातील ग्रामस्थांनी पहिल्यांदा तिरंग्याला वंदन केलं. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या चांदामेटा गावात नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. एकेकाळी नक्षलवादी तिथं प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवायचे. चांदामेटा गावाला नक्षलवाद्यांची राजधानी म्हटलं जायचं, मात्र सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचं वर्चस्व कमी केलं आहे.
पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांनी चांदामेटा परिसरातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. चांदामेटाच्या भागात सुरक्षा दलांनी कॅम्प टाकले आहेत. त्यामुळं चांदामेटा गावातील लोकांनी आणि सुरक्षा दलांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चांदामेटा गावातील लोकांनी सकाळपासून घराबाहेर पडून सुरक्षा दलांच्या कॅम्पजवळ जमा होण्याचा निर्णय घेतला होता.
सुरुवातीला कॅम्पमध्ये जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसोबत मिळून झेंडावंदन केलं. ग्रामस्थांनी यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांच्या साथीनं तिरंगा हाती घेत गावातून फेरी काढली. एकेकाळी ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला बस्तर जिल्हा बदलत असल्याचं दिसत आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतर चांदामेटा गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तांदूळ 12 पैसे, साखर 40 पैसे किलो, पेट्रोल 25 पैसे लीटर; गेल्या 75 वर्षांत 'अशा' बदलल्या किमती
गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही हैराण व्हाल. तेव्हाच्या आणि आताच्या किमती जाणून घेऊया.1947 मध्ये एक किलो तांदूळ 12 पैशांना मिळत होता, जो आज 40 रुपये किलोने विकला जातो. तसेच साखर तेव्हा 40 पैसे प्रतिकिलो होती, पण आज 42 रुपये किलो आहे. बटाटा 25 पैशांवरून 25 रुपयांवर गेला आहे. दूध 12 पैशांवरून 60 रुपये किलोवर पोहोचलं आहे.
आज पेट्रोल 97 रुपये लिटर आहे पण 1947 मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल फक्त 25 पैशांना मिळायचे. आज सायकलची किंमत 8,000 रुपये आहे, 1947 मध्ये ती फक्त 20 रुपयांना मिळत होती. तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त 140 रुपये खर्च करून दिल्ली ते मुंबई जाऊ शकत होता. मात्र, आता तुम्हाला यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे महागाईशी लढण्याचे हत्यार असलेले सोने 1947 मध्ये 88 रुपयांना 10 ग्रॅम होते. आज तेच सोने 52 हजार रुपयांवर पोहोचले आहे.