'सैनिक सर्जिकल स्ट्राइक-एअरस्ट्राइक करतात, तेव्हा तरुणांची...'; PM मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले जनतेचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:57 AM2024-08-15T08:57:42+5:302024-08-15T08:58:18+5:30
Independence Day 2024 : पंतप्रधान मोदी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते...
PM Narendra Modi Independence Day 2024 : आपल्या देशात दहशतवादी हल्ले करून निघून जात होते. मात्र, जेव्हा देशाचे जवान सर्जिकल स्ट्राइक करतात, एअरस्ट्राइक करतात तेव्हा तरुणांची छाती गर्वाने फुलते. अशाच गोष्टी देशवासियांना भारावून टाकत असतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते.
राष्ट्रहित सर्वोपरी मानून सुधारणा केल्या -
मोदी म्हणाले, "जेव्हा आम्हाला जबाबदारी मिळाली, तेव्हा आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. आम्ही बदल घडवून आणण्यासाठी रिफॉर्म स्वीकारले. आमचे कौतुक व्हावे म्हणून आम्ही सुधारणा करत नाही. आम्ही 'मजबूरी'म्हणून नाही, तर मजबूती देण्यासाठी सुधारणा करत आहोत. आम्ही राजकारणासाठी सुधारणा करत नाही. आमचा केवळ एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे, नेशन फर्स्ट, अर्थात राष्ट्रहित सुप्रीम. माझा देश महान बनावा, हाच संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
जगात भारताचा मान वाढला -
पंतप्रधान म्हणाले, लोकांना स्वातंत्र्यतर मिळाले, मात्र त्यांना प्रत्येक सुविधा मिळवण्यासाठी सरकारपुढे हात पसरावे लागत होते. आज सरकार घरा-घरापर्यंत नळाने पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.
दहा वर्षे इंफ्रास्ट्रक्चरवर काम करण्यात आले -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या एका दशकात रस्ते, रेल्वे, हायवे, शाळा-कॉलेज, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, अमृत सरोवर, दोन लाख ग्राम पंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे तयार करून इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले.
...अशी आहेत देशातील जनतेची मोठी स्वप्ने -
विकसित भारतासाठी जनतेकडून मागवण्यात आलेल्या सूचनांसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आम्ही विकसित भारत 2047 साठी देशवासीयांकडून सूचना मागवल्या आहेत. मिळालेल्या अनेक सूचना आपल्या जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा दर्शवणाऱ्या आहेत. काही लोक म्हणत आहेत, भारत कौशल्याची राजधानी व्हावा, काही लोकांचे म्हणणे आहे की, भारत उत्पादन केंद्र व्हावा, तो आत्मनिर्भर वाहा. काहींचे म्हणणे आहे, ग्रीनफिल्ड शहरे बनवावीत, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असावे, अशी आहेत देशातील जनतेची मोठी स्वप्ने. यामुळे आपला आत्मविश्वास एका नव्या उंचीवर पोहोचतो आणि अधिक दृढ होतो.