Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 07:07 PM2018-08-13T19:07:38+5:302018-08-14T14:21:43+5:30
भारत आणि पाकिस्तान असे दोन देश फाळणीनंतर तयार झाले, भारताच्या पूर्वेस पूर्व पाकिस्तान व पश्चिमेस पश्चिम पाकिस्तान तयार झाला.
मुंबई- 1947 साली भारताची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले एवढे आपल्याला माहिती असते. मात्र या फाळणीमुळे भारताचे कसे तुकडे पडले, कोणी ते पाडले, कसे पाडले याबद्दल फारशी माहिती नसते. आज भारतीय उपखंडाची राजकीय स्थिती पाहिली की भारताची फाळणी अत्यंत घाई-घाईत करण्यात आल्याचे दिसून येते. त्याचे परिणाम आजही दोन्ही देश भोगत आहेत.
17 ऑगस्ट 1947 रोजी दोन्ही देशांमध्ये रॅडक्लिफ लाइन आखून दोन वेगळे देश निर्माण करण्यात आले. सर सिरील रॅडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निश्चित केली. ते सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि भारत असे तीन भाग करण्यात आले. नंतर पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला आणि अत्याचारांना कंटाळून पूर्व पाकिस्तानने लढा देऊन 1971 साली स्वतंत्र बांगलादेश मिळवला.
रॅडक्लिफ यांनी फाळणीची रेषा आखण्यासाठी भारतात येण्यापूर्वी कधीही भारत पाहिलेला नव्हता. येथील सामाजिक घटकांची त्यांना काहीही माहिती नव्हती. भारताच्या समाजरचनेचा, भौगोलिक स्थितीचा, लोकसंख्येचा कोणताही अभ्यास त्यांनी केला नव्हता. इंग्लंडमधील एक उत्तम वकील म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म 30 मार्च 1899 रोजी वेल्स या प्रांतात झाला. भारताची फाळणीरेषा आखल्याबद्दल त्यांना लॉ लॉर्ड आणि नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या सन्मानाने गौरविण्यात आले होते.
8 जुलै 1947 साली ते पहिल्यांदा भारतात आले. रॅडक्लिफ यांना अशी घाई-गडबडीत सीमारेषा आखण्याची कल्पना आवडलेली नव्हती. त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत काम पूर्ण करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. रॅडक्लिफ यांनी रेषा आखल्यापोटी सरकारने देऊ केलेली 3000 पौंडाची रक्कमही नाकारल्याचे सांगण्यात येते. आपल्या फाळणीरेषेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच रॅडक्लिफ यांनी भारत सोडून इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आणि 15 ऑगस्ट रोजीच ते निघून गेले. 16 ऑगस्ट रोजी फाळणीच्या रेषेचा अहवाल वाचण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना केवळ दोन तास देण्यात आले आणि
तर लाहोर भारतात आले असते-
रॅडक्लिफ यांना लाहोर शहर भारतामध्ये देण्याची इच्छा होती. मात्र तसे करण्याने पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळाले नसते. भारताच्या वाट्याला कोलकाता शहर गेल्यामुळे त्यांनी लाहोर शहर पाकिस्तानच्या बाजूला देण्याचे निश्चित केले.