Independence Day: लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था; स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ४००० लोकांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:44 IST2020-08-15T06:14:01+5:302020-08-15T06:44:57+5:30
सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज आहे.

Independence Day: लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था; स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ४००० लोकांना निमंत्रण
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमास ४००० हून अधिक लोकांना निमंत्रण दिले आहे. यात नेते, अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी यांचा समावेश आहे, अशी माहिती शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने दिली. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज आहे. बिगरकाँग्रेसी पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी सर्वाधिक काळ या पदावर होते. आता हा विक्रम मोदींच्या नावावर असणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, कार्यक्रमस्थळी दोन पाहुण्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे.
‘गार्ड ऑफ ऑनर’च्या सदस्यांना क्वारंटाइन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जागेवर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.
सर्व निमंत्रितांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सॅनिटायझरचीही व्यवस्था केली आहे. रांगेची गर्दी टाळण्यासाठी मोठ्या चौकटीचे दरवाजे लावले आहेत.
सर्व प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग होईल. केवळ आमंत्रितच यात भाग घेऊ शकतील. आरोग्य सुविधा आणि अॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था ठेवली आहे. सर्व कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पालनाच्या सूचना दिल्या आहेत.