Independence Day: दहा वर्षं केवळ एक रुपया वेतन घेणाऱ्या देशभक्त सैनिकाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 01:02 PM2018-08-10T13:02:52+5:302018-08-10T13:26:21+5:30
26 वर्षांत तब्बल 55 हजार युवकांना सैन्य भरतीचे प्रशिक्षण
जालंधर : देश सेवेचे ब्रिद, कामाची आवड; सरकारद्वारा 19 वेळा मुदतवाढ, दहा वर्षांत केवळ 1 रुपया वेतन. ही गोष्ट आहे एक निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनमोहन सिंह यांची. सर्जिकल स्ट्राईकचा ब्रेन म्हणून ओळखले जाणारे जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांचे ते वडील आहेत.
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 1987मध्ये त्यांनी जालंधरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली. साधारणपणे या पदावर एक वर्षानंतर दुसरा अधिकारी येतो. परंतु, मनमोहन यांची कामकाजाची पद्धत, उत्साह पाहून पंजाब सरकारने त्यांचा चक्क 19 वेळा कार्यकाळ वाढविला. विशेष म्हणजे मनमोहन सिंह यांनी शेवटच्या 10 वर्षांत केवळ 1 रुपया मासिक वेतन घेतले. ते 2013 पर्यंत या पदावर राहिले.
मनमोहन सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत. या 26 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सैन्यात जाण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालविले. त्यांच्या या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी पंजाबमधूनच नव्हे तर शेजारील राज्यांमधूनही तरुण येत होते. त्यांनी तब्बल 55 हजार तरुणांना प्रशिक्षण दिले. ते केवळ अधिकारी पदावरच समाधानी नव्हते. त्यांनी हजारो युवकांना सैन्य, हवाईदल, नौदल, बीएसएफ आणि पंजाब पोलीस दलामध्ये हवालदार ते अधिकारी पदापर्यंत भरतीसाठी प्रशिक्षित केले.
भारतीय सैन्यामध्ये जेव्हा महिलांना भरती करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा त्यांनी महिलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु केले. येथून प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक महिला आज लष्कारात सेवा बजावत आहेत. बीएसएफच्या पहिल्या महिला बटालियनमधील 130 महिला या मनमोहन सिंह यांच्या प्रशिक्षण केंद्रातील होत्या.
देशाने आपल्याला खुप काही दिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण देशाची सेवा करणार आहे. युवकांमध्येही देशसेवेचे ब्रिद पाहायचे आहे, असे मनमोहन सिंह मोठ्या गर्वाने सांगतात.