Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 09:03 AM2020-08-15T09:03:14+5:302020-08-15T09:25:52+5:30
Independence Day 2020 : कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 24 लाखांवर पोहोचली आहे. तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. याच दरम्यान पंतप्रधानांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
"कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना संबोधित करताना देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे.
Today three vaccines are in testing stages in India. As soon as the scientists give a green signal, the country will begin their large scale production: PM Narendra Modi at the Red Fort on #IndependenceDaypic.twitter.com/gMrhSYjQwp
— ANI (@ANI) August 15, 2020
"आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल. तुमची प्रत्येक चाचणी, आजार याची माहिती त्या आयडीमध्ये असेल" असं ही पंतप्रधानांनी सांगितलं. "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
"भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास" https://t.co/0h5d2kUqKG#IndependenceDayIndia#IndependenceDay2020#NarendraModi#AtmaNirbharBharat
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2020
130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे असंही मोदींनी सांगितलं. जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला, असे मोदी म्हणाले.