अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 06:38 PM2024-10-09T18:38:33+5:302024-10-09T18:39:49+5:30

​​​​​​​Savitri Jindal : नवीन जिंदाल म्हणाले की, सावित्री जिंदाल भाजपला पाठिंबा देतील.

Independent MLA Savitri Jindal supports BJP MP Naveen Jindal CM Nayab Singh Saini cabinet Minister | अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...

अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...

Savitri Jindal :हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. कुरुक्षेत्रचे भाजप खासदार आणि सावित्री जिंदाल यांचे पुत्र नवीन जिंदाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. नवीन जिंदाल म्हणाले की, सावित्री जिंदाल भाजपला पाठिंबा देतील. हिसारच्या विकासासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत विचारलं असता नवीन जिंदाल म्हणाले की, मंत्रिमंडळात सावित्री जिंदाल यांचा समावेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. तसंच, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सावित्री जिंदाल यांना पूर्ण सन्मान दिला जाईल, असं आश्वासन दिल्याचं नवीन जिंदाल यांनी सांगितलं. याशिवाय, काँग्रेसनं एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित करण्याबाबत विचारलं असता नवीन जिंदाल म्हणाले की, निवडणूक आयोगाला भेटणं हा काँग्रेसचा अधिकार आहे, मात्र एक्झिट पोलच्या आधारे काँग्रेस हरयाणामध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करत होती. तसंच, जिथं काँग्रेस जिंकतं, तिथं सर्व काही ठीक असंत आणि जिथं काँग्रेसचा पराभव होतो, तिथं सर्वकाही चुकीचं होतं.

दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांना तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून सावित्री जिंदाल यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या आहेत. सावित्री जिंदाल यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून डॉ. कमल गुप्ता आणि काँग्रेसकडून रामनिवास राणा होते. हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. सावित्री जिंदाल यांना हिस्सारमधून एकूण ४९२३१ मते मिळाली. तर काँग्रेसच्या रामनिवास राणा यांना ३०२९० मते मिळाली. याशिवाय, भाजपच्या डॉ. कमल गुप्ता यांना १७३८५ मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार संजय सत्रोदिया यांना केवळ २००१ मते मिळाली आहेत. 

देशातील सर्वात श्रीमंत महिला; २.७७ लाख कोटींची संपत्ती
हिसारमधून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत ओपी जिंदाल यांच्या पत्नी आहेत. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, सावित्री जिंदाल या २.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीन आहेत. तसेच, त्या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत.

Web Title: Independent MLA Savitri Jindal supports BJP MP Naveen Jindal CM Nayab Singh Saini cabinet Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.