निर्देशांकांची घसरण; दीड वर्षातील वाईट सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:07 AM2017-08-14T01:07:22+5:302017-08-14T01:07:25+5:30
अमेरिका आणि उत्तर कोरियातील वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारावर आलेल्या विक्रीच्या दबावाचा परिणाम भारतीय बाजारावरही झालेला दिसून आला
प्रसाद गो. जोशी
अमेरिका आणि उत्तर कोरियातील वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारावर आलेल्या विक्रीच्या दबावाचा परिणाम भारतीय बाजारावरही झालेला दिसून आला. संपूर्ण सप्ताहामध्ये निर्देशांकाची मोठी घसरण झाल्याने दीड वर्षातील सर्वात वाईट सप्ताह ठरला. त्यातच आर्थिक सर्वेक्षणामध्ये अपेक्षित असलेला आर्थिक वृद्धीचा दर कायम राखणे शक्य नसल्याचे जाहीर झाल्याने घसरण वाढली.
सलग पाच सप्ताहांमध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाल्याने, निर्देशांकांमध्ये विक्रमी वाढ झाली होती. त्यामुळे बाजारात करेक्शन येणे अपेक्षितच होते. त्यामुळे जे घडले, ते फारसे अनपेक्षित नव्हते. सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ११११.८२ अंशांनी घसरून ३१२१३.५९ अंशांवर बंद झाला. हा त्याचा महिन्यातील नीचांक आहे. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही ३५५.६० अंश म्हणजे, ३.५३ टक्क्यांनी घसरून ९७१०.८० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण झालेली दिसून आली.
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढत चालला असून, त्याचे परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाले आहेत. सर्वच बाजारांमधील निर्देशांक घसरले असून, सर्वत्र विक्री वाढली आहे. त्याचप्रमाणे, सोने आणि बाँड्स हे अधिक सुरक्षित पर्याय गुंतवणुकीसाठी निवडले जात आहेत. जागतिक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १९४३ कोटींची विक्री केली, तर देशी परस्पर निधींनी २०१६ कोटींची खरेदी केली आहे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये आर्थिक वृद्धीचा अपेक्षित धरलेला दर गाठणे कठीण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शेतकºयांना दिलेली कर्जमाफी, जीएसटी यामुळे हे होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या अखेरीस भारतीय स्टेट बॅँकेचे तिमाही निकाल जाहीर झाले. ते फारसे समाधानकारक नसल्याने बाजारामधील घसरण वाढली.
>नऊ प्रमुख आस्थापनांच्या बाजार भांडवलात घट
मुंबई शेअर बाजारातील दहा प्रमुख आस्थापनांपैकी नऊ आस्थापनांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये गतसप्ताहाच्या अखेरीस १ लाख ५ हजार ३५७ कोटी रुपयांनी घट झाली आहे. बाजार तीन टक्क्यांनी घटल्यामुळे हे मूल्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. इन्फोसिस या आस्थापनेचे बाजार भांडवल मूल्य वाढलेले दिसून आले.रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बाजार
भांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक २४ हजार ६७१.४१ कोटी रुपयांची घट झाली आहे. या पाठोपाठ भारतीय स्टेट बॅँक (२१४०७.४९ कोटी), आयटीसी (१०८८२.६० कोटी), एचडीएफसी बॅँक (१०२७४.८३ कोटी), मारुती सुझुकी (९८४३.२८ कोटी) यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये घट झाली आहे.
बाजार भांडवल घटलेल्या
अन्य आस्थापनांमध्ये हिंदुस्तान
युनिलिव्हर (८४५२.२४ कोटी), ओएनजीसी(८१४९.१० कोटी), एचडीएफसी (६१७२.४६ कोटी) आणि टीसीएस (५५०३.५७ कोटी) आहेत.