संबंध दृढ करण्यासाठी भारताचे मालदीवला ४० कोटी डॉलरचे साह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:24 AM2024-10-08T09:24:14+5:302024-10-08T09:24:35+5:30
पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवणार; रुपे कार्डद्वारे वित्तीय देवाण-घेवाण
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांनी सोमवारी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ४० कोटी डॉलर्सची मदत करण्यासह चलन अदलाबदलीच्या करारावर स्वाक्षरी केली. तसेच बंदरे, रस्त्यांचे जाळे, शाळा, गृहप्रकल्पांचे बांधकाम याच्या सहकार्यासाठी सहमती दर्शवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पहिल्या रुपे व्यवहाराचे साक्षीदार झाले. याप्रसंगी मोदी यांनी म्हटले की, आगामी काळात भारत आणि मालदीव यूपीआयच्या माध्यमातून जोडले जातील.’ याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी मालदीवमधील ‘हनिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या धावपट्टीचे उद्घाटन केले.
अनेक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या
दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्याही केल्या. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सांगितले की, आमची एका व्यापक व्हिजन दस्तावेजावर सहमती झाली, जो प्रगतीची दिशा निश्चित करेल. भारताच्या सहकार्याने बांधलेली ७०० पेक्षा अधिक सामाजिक निवासस्थाने यावेळी मालदीवला सोपविण्यात आली.
समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू
मोदी यांनी सांगितले की, भारत आणि मालदीव यांचे संबंध अनेक शतके जुने आहेत. आमच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणात तसेच ‘सागर व्हिझन’मध्ये मालदीवला महत्त्वपूर्ण स्थान आहे. मालदीवमधील अड्डू येथे भारतीय वाणिज्य दूतावास व बंगळुरूमध्ये मालदीवचा वाणिज्य दूतावास सुरू करण्यावर दोन्ही देशांनी चर्चा केली. याशिवाय ‘एकथा बंदर प्रकल्पा’वर गतीने काम सुरू आहे. हिंदी महासागर क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये संस्थापक सदस्य म्हणून मी मालदीवचे स्वागत करतो.