भारतात २५ टक्के मृत्यू होतात हृदयरोगामुळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:50 AM2018-07-16T04:50:27+5:302018-07-16T04:50:43+5:30
भारतात २०१५ मधील मृत्यूंच्या २५ टक्के प्रकरणात हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे आजार कारण असून मोठ्या प्रमाणात ग्रामीण लोकसंख्या आणि तरुणांना हा विकार लक्ष्य करत असल्याचे एका अध्ययनात म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतात २०१५ मधील मृत्यूंच्या २५ टक्के प्रकरणात हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे आजार कारण असून मोठ्या प्रमाणात ग्रामीण लोकसंख्या आणि तरुणांना हा विकार लक्ष्य करत असल्याचे एका अध्ययनात म्हटले आहे. टोरंटो येथील सेंट माइकल हॉस्पिटलच्या सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चचे संचालक प्रभात झा यांच्या नेतृत्वात झालेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.
या अध्ययनात म्हटले आहे की, देशातील ग्रामीण भागात ३० ते ६९ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या संकुचित होण्याचे प्रकार दिसून येत आहेत. यातून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. २००० ते २०१५ या काळात शहरी भागात समोर आलेल्या प्रकरणांपेक्षा ग्रामीण भागातील प्रकरणे अधिक आहेत.
याउलट ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारताच्या पूर्वोत्तर भागात यात वृद्धी झालेली दिसून येत आहे. या राज्यांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे होणाºया मृत्युंचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास तीन पट अधिक आहे. झा म्हणाले की, यातील अनेक मृत्यू हे घरीच होतात.