पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 10:57 AM2023-10-09T10:57:34+5:302023-10-09T11:06:35+5:30
आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.
नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असून यावेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु शकते, असं सांगण्यात येत आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितले आहे. तसेच पाचही राज्य २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. पाचही राज्यात आम्ही विजयी होऊ. छत्तीसगड आणि राजस्थान आमच्याकडे आहे. मध्य प्रदेश जिंकलो होतो, तेलंगणा जिंकण्याची खात्री असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. १४ महानगरपालिकांच्याही निवडणुका जाहीर करा, असं आवाहन देखील संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला केलं आहे.
छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी मतदान-
छत्तीसगडमधील ९० जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आणि भूपेश बघेल राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मिझोरमच्या ४० जागांवर मतदान-
या वर्षाच्या अखेरीस ४० जागांसह मिझोरममध्येही निवडणुका होणार आहेत. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले.