इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 01:08 PM2024-06-18T13:08:08+5:302024-06-18T13:10:33+5:30

Lok Sabha Speaker Post Election - लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली असून विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडीतून एनडीएत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

INDIA Alliance offer lok sabha speaker post to TDP, BJP not worried ; know the number game of Lok Sabha | इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

नवी दिल्ली - सरकार स्थापनेनंतर आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात एनडीएच्या घटक पक्षांमध्ये सर्वसहमती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी भाजपानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर दुसरीकडे विरोधी इंडिया आघाडीनेही लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी सरकारवर दबाव वाढवणं सुरू केले आहे. जर लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं नाही तर आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवू असं इंडिया आघाडीनं म्हटलं आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ठाम राहायला हवं असं विरोधी पक्ष वारंवार सांगत आहेत. जर टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवला तर इंडिया आघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळेल असा प्रयत्न आम्ही करू हे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टीडीपीला इंडिया आघाडीकडून मिळालेली ऑफर भाजपाचं राजकीय गणित बिघडवेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टीडीपीला लोकसभेचं अध्यक्षपद हवं, मात्र भाजपाने त्यास नकार दिला आहे. आता विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या महत्त्वाकांक्षेला हवा देत एनडीएमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी आणि नितीश कुमार यांची जेडीयू हे या निवडणुकीच्या निकालात किंगमेकर ठरले आहेत. नायडू यांनी वेगळी भूमिका घेतली तर मोदी सरकारकडे संख्याबळ २९३ वरून २७७ होईल जे बहुमतासाठी लागणाऱ्या २७२ आकड्यापासून केवळ ५ अधिक जागा असतील असं विरोधी पक्षाला वाटतं. लोकसभेच्या परंपरेनुसार जर अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे राहिले तर विरोधकांकडे उपाध्यक्ष पद दिले जाते. मागील ५ वर्षाच्या काळात उपाध्यक्षपद रिक्त राहिलं आहे. मात्र यंदा हे पद मिळावं यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे.

लोकसभेचा नंबरगेम कसा आहे?

लोकसभेचा नंबरगेम पाहिला तर भाजपाच्या नेतृत्वात एनडीएकडे २९३ खासदार आहेत. त्यात भाजपाकडे २४० खासदार आहे. त्यानंतर टीडीपी १६, जेडीयू १२, शिवसेना ७, लोक जनशक्ती पार्टी ५ खासदार आहेत. त्यानंतर इतर १० पक्षांचे १३ खासदार आहेत. तर विरोधी इंडिया आघाडीकडे २३४ खासदार आहेत. लोकसभेच्या ९९ जागांवर विजय मिळवत विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर समाजवादी ३७, ममता बॅनर्जींची टीएमसी २९, डिएमके २२ जागांवर विजयी झाली आहे. जर टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदी उमेदवार दिला तर इंडिया आघाडीचं समर्थन मिळालं तरी त्यांचा आकडा २५० जागांवर पोहचतो जो बहुमताच्या २७२ आकड्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे टीडीपीशिवायही एनडीएकडे २७७ जागांचे बहुमत राहील. 
 

Web Title: INDIA Alliance offer lok sabha speaker post to TDP, BJP not worried ; know the number game of Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.