NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:03 PM2024-03-07T12:03:44+5:302024-03-07T12:05:59+5:30
राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे.
पटना - लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही. बिहारमध्ये एनडीए घटक पक्षात जागावाटपाचा तिढा आणखी वाढत चालला आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपति पारस यांच्यातील वादामुळे एनडीएतील जागावाटप लांबणीवर पडले आहे. ज्यावरून आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएमध्ये चिराग पासवान आणि पशुपति पारस यांना एकूण ६ जागा देण्याची चर्चा आहे. परंतु दोघेही त्यासाठी तयार नाहीत. चिराग पासवाग यांनी २०१९ च्या फॉर्म्यल्याप्रमाणे लोक जनशक्ती पार्टी ६ खासदार जिंकले होते. त्यानुसारच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६ जागा देण्यास याव्यात अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पशुपति पारस यांनी ६ पैकी ५ खासदार माझ्यासोबत आहेत त्यामुळे आम्हाला ६ जागा सोडाव्यात असं म्हटलं आहे.
काका-पुतण्याची लढाई
काका पुतण्याची आणखी एक लढाई हाजीपूर लोकसभा मतदारसंघावरून सुरू आहे. ज्याठिकाणी दोघांनी दावा केला आहे. त्याठिकाणी पशुपति पारस हे स्वत: खासदार आहेत. परंतु चिराग पासवान यांनी रामविलास पासवान यांचा राजकीय वारसदाराचा हवाला देत हाजीपूर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. हाजीपूर जागेवर चिराग पासवान आणि पशुपति पारस यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार एनडीत आल्यानंतर चिराग पासवान यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांची ही अडचण पाहता महाआघाडीने त्यांना आपल्याकडे वळवण्यात प्रयत्न सुरू केले आहेत. चिराग पासवान बिहारमध्ये महाआघाडीचे घटक पक्ष बनतील असा दावा केला जात आहे. इतकेच नाही तर चिराग पासवान हे महाआघाडीत सहभागी झाले तर त्यांना बिहारमध्ये लोकसभेच्या ८ जागा आणि उत्तर प्रदेशात २ लोकसभा जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, चिराग पासवान इंडिया आघाडीच्या या ऑफरवर काय भूमिका घेतात हे स्पष्ट नाही. परंतु एनडीएमध्ये जर चिराग यांना त्यांच्या मनासारख्या जागा मिळाल्या नाहीत तर त्यांच्याकडे इंडिया आघाडीसोबत जाण्याचा मार्ग खुला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे.