नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 08:51 AM2024-01-13T08:51:30+5:302024-01-13T08:51:50+5:30
INDIA Alliance Meet: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
INDIA Alliance Meet: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी केली असून, विविध कार्यक्रम, लोकार्पण सोहळे यातून निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेत्यांचे काहीच ठोस असे ठरताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची एक व्हर्च्युअल बैठक होणार असून, यामध्ये जागावाटपाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा संयोजक करण्याची तयारी सुरू असली तरी तृणमूल काँग्रेसने या निवडीवर आक्षेप घेतल्याचे समजते. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे. आघाडी मजबूत करणे, जागावाटपाची रणनीती बनवणे, आघाडीचे समन्वयक नेमणे, अशा काही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यासाठी कटिबद्ध
मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती देण्यात आली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांचे आधीच काही नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. तृणमूल काँग्रेसने ही बैठक पुढील आठवड्यात घ्यावी, अशी सूचना केली होती. ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित नसल्या तरी टीएमसी इंडिया आघाडीसोबत आहे आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ज्यामध्ये जागा वाटपाची चर्चा, १४ जानेवारीपासून इंफाळपासून सुरू होणारी 'भारत जोडो न्याय यात्रा' आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. दुसरीकडे, अनेक प्रश्नांवर एकमत झाल्याचे पाहायला मिळत नाही. आघाडीत समन्वयक नियुक्तीचाही समावेश आहे. जागांवरील दावे आणि प्रतिदावे यांमुळे विरोधी गटातील सदस्यांशी जागावाटपाची चर्चाही आतापर्यंत फलदायी ठरलेली नाही. हे मतभेद मिटवून आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी विविध पक्षांचे नेते भेटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.