भारत आणि चीनमध्ये होणार युद्ध, अमेरिका देणार भारताला साथ - मेघनाद देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 10:17 PM2017-08-04T22:17:35+5:302017-08-04T22:19:55+5:30
भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते
नवी दिल्ली, दि. 4 - डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले असतानाच आशिया खंडातील या दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केली आहे. भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते आणि असे झाल्यास भारत आणि अमेरिका एका बाजूला तर चीन एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होईल, असे देसाई यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मजूर पक्षाचे सदस्थ असलेल्या देसाई यांनी सांगितले की, "डोकलाम येथील तणाव हा केवळ भारत आणि चीनमधील प्रश्न नाही. तर तो जगभरातील तणाव आणि दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त मुद्यांशी संबंधित आहे."
देसाई यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतील देसाई म्हणाले, "डोकलामचा प्रश्न निकाली निघतोय असे आजही कुणी मान्य करणार नाही. पुढच्या एका महिन्याच्या आत आपल्यावर चीनसोबत एक संपूर्ण युद्धाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या स्थितीत हो युद्ध रोखता येणार नाही. ही बाब आश्चर्यजनक असू शकते. पण अशा परिस्थितीत भारताचा अन्य देशांशी असलेले संरक्षण विषयक संबंध फायदेशीर ठरू शकतात."
मात्र भारत आणि चीनमध्ये खरोखरच युद्ध होण्याची शक्यता आहे का, याबाबत देसाई म्हणतात, "मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी दिवस आणि तारीख सांगू शकत नाही. पण सध्याच्या स्थितीचा विचार करता चीनसोबत संपूर्ण युद्ध लढण्याची वेळ आमच्यावर लवकरच येऊ शकते. तसेच हे युद्ध केवळ डोकलामच नाही तर अनेक आघाड्यांवर लढले जाईल. कदाचित संपूर्ण हिमालयामध्येही युद्धाचा आगडोंब उसळू शकतो."
"भारत आणि अमेरिकेमध्ये विश्वासपूर्ण संबंध आहेत. तसेच दोन्ही देश सहजपणे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकतात. त्यामुळे भारत आणि चिनमध्ये युद्ध सुरू झाल्यास अमेरिका निश्चितपणे भारताच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभी राहील. भारत अमेरिकेच्या मदतीशिवाय चीनसोबत लढू शकत नाही आणि अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा मुकाबला करू शकत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे." असे देसाई पुढे म्हणाले.
"मात्र दोन्ही देशात युद्ध व्हायचे असल्याच दक्षिण चीन समुद्रातील घटनांवर सारे काही अवलंबून असेल. त्यासंदर्भात अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले. तर ते चीन आणि अमेरिकेमध्ये होईल, ज्यात भारत अमेरिकेच्यासोबत असेल," असेही त्यांनी शेवटी सांगितले.