भारत आणि फ्रान्समधील संबंध ऐतिहासिक - इमँन्युएल मँक्रोन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 01:27 PM2018-03-10T13:27:44+5:302018-03-10T13:27:44+5:30
या प्रदेशात ( भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे.
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांचे संबंध अत्यंत जुने आणि ऐतिहासिक आहेत अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमँन्युएल मँक्रोन यांनी आपला भारत दौरा सुरु केला आहे. राष्ट्राध्यक्ष मँक्रोन ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज राष्ट्रपती भवन येथे त्यांचे संमारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. मँक्रोन यांचे स्वागत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपती भवनातील भेटीनंतर मँक्रोन राजघाट येथे रवाना झाले.
इमँन्युएल मँक्रोन आपली पत्नी ब्रिगेट मेरी- क्लाऊड मँक्रोन यांच्यासह काल संध्याकाळी उशिरा भारतात दौऱ्यासाठी दाखल झाले. तसेच काही फ्रेंच उच्चपदस्थ अधिकारी व उद्योजकसुद्धा त्यांच्याबरोबर या दौऱ्यात सामील झाले आहेत. यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी मँक्रोन यांची चर्चा होणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते इंटरनँशनल सोलर अलायन्स या परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यामधील राजकीय, आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील असे दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनपत्रात म्हटले आहे.
राष्ट्रपती भवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मँक्रोन म्हणाले, "दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे, भारत फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. या प्रदेशात ( भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे तसेच फ्रान्स हा भारतासाठी युरोपात प्रवेश करण्यासाठी द्वार म्हणून ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे". जानेवारी २०१६ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकोई ओलांद यांनी भारताला भेट दिली होती. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते भारतात आले होते.