ऑपरेशन सनशाइन 2; म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 10:05 AM2019-06-16T10:05:35+5:302019-06-16T10:06:40+5:30
या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या समाविष्ट होत्या. तसेच भारतीय सीमेवर विशेष दल, आसाम रायफल्स आणि अनेक सुरक्षा जवान तैनात होते.
नवी दिल्ली - भारत आणि म्यानमारच्या लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत सीमेवर असणाऱ्या माओवाद्यांच्या कॅम्पला उद्ध्वस्त करण्यात आले आहे तसेच पळून जाणाऱ्या काही माओवाद्यांना पकडण्यातही भारतीय लष्कराला यश आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सनशाइन 2 ठेवण्यात आलं होतं. 16 मेपासून 8 जूनपर्यंत भारतीय लष्कर आणि म्यानमारच्या सेनेने संयुक्त कारवाई केली. उत्तर पूर्वेकडील माओवाद्यांसाठी हा सर्वात मोठा झटका आहे.
या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या समाविष्ट होत्या. तसेच भारतीय सीमेवर विशेष दल, आसाम रायफल्स आणि अनेक सुरक्षा जवान तैनात होते. तर म्यानमारकडून या कारवाईत 4 बटालियन सहभागी झाल्या होत्या. ऑपरेशन सनशाइन 1 हे 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं. त्याचाच पुढील भाग म्हणून लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी भारतीय लष्कराने देशाच्या सीमेवर असणाऱ्या संशयित विद्रोही माओवाद्यांच्या कॅम्पवर कारवाई केली होती.
या संयुक्त कारवाईबाबत बोलताना भारतीय लष्करातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे ऑपरेशन सेनेच्या पातळीवर ठरविण्यात आले होते. ऑपरेशन सनशाइन 1मध्ये म्यानमार आणि भारताच्या दोन्ही जवानांनी विश्वासाने एकत्र येत संयुक्त कारवाई केली त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. भारत म्यानमारदरम्यान रस्त्याचे काम करत आहे त्यामुळे पूर्वेकडे असणाऱ्या देशांसोबत भारताचे व्यापार संबंध मजबूत होणार आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान होत असलेल्या रस्त्याच्या विकासकामाला विरोध करण्यासाठी याठिकाणी माओवादी हल्ला करण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमेवर हायअलर्टही जारी करण्यात आला आहे. ऑपरेशन सनशाइन 2 दरम्यान भारतीय लष्कराने जवळपास 70-80 माओवाद्यांना पकडलं आहे त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माओवाद्यांच्या उल्फा, केएलओ, एनईएफटीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. 2015 मध्येही भारतीय लष्करांकडून म्यानमार सीमेवर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी म्यानमार सेनेने भारतीय लष्कराच्या कारवाईंवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा म्यानमार सेनेला विश्वासात घेऊन भारतीय लष्कराने ही संयुक्त कारवाई केली.