CoronaVirus News: आमच्या लसी स्वीकारा, अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:46 AM2021-07-01T08:46:58+5:302021-07-01T08:47:28+5:30
CoronaVirus News: कोविशील्ड, कोवॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. भविष्य काळात परदेशी प्रवास करताना लसीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र युरोपियन युनियननं कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत केलेला नाही. त्याबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही लसी स्वीकारा, अन्यथा युरोपियन युनियनच्या नागरिकांना भारतात आल्यावर क्वारंटिन करण्यात येईल, असा थेट इशारा भारताकडून देण्यात आला आहे.
युरोपियन युनियननं आपल्या ग्रीन पास योजनेच्या अंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असं आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आलं आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. 'ग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटिनमधून सवलत देऊ. पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला मंजुरी द्या,' असं भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आलं आहे.
कोविन पोर्टलच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं लसीकरण प्रमाणपत्र स्वीकारण्याची विनंती भारताकडून युरोपियन युनियनला करण्यात आली आहे. युरोपियन युनियनची डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना म्हणजेच 'ग्रीन पास' योजना गुरुवारपासून लागू होईल. या माध्यमातून नागरिकांना प्रवास करता येईल.
ग्रीन पास योजना म्हणजे काय?
युरोपियन वैद्यकीय संस्थेनं (ईएमए) मंजुरी दिलेल्या लसी घेतलेल्या लोकांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. ईएमएनं मंजुरी दिलेल्या न दिलेल्या लसी घेतलेल्या व्यक्तींना ग्रीन पास योजनेचा लाभ घेता येणार नाही. कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत करण्यात आलेला नाही. भारतात लसीकरणात याच दोन लसींचा प्रामुख्यानं वापर होत आहे.