कॅनडाच्या नेतृत्वाखालील बैठकीपासून भारत दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 03:56 AM2020-12-06T03:56:20+5:302020-12-06T03:56:48+5:30
कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली - कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास कॅनडाचे पंतप्रधान पी. एम. जस्टीन ट्र्युड्यू यांनी समर्थन दिल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जयशंकर हे बैठकीला हजर राहू शकणार नाहीत, असे भारताने कॅनडास अधिकृतरीत्या कळविले आहे. कॅनडाचे परराष्ट्रमंत्री फ्रान्सिस्कॉईस-फिलिप शॅम्पेन यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. शॅम्पेन यांनी गेेल्या महिन्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीला जयशंकर यांनी हजेरी लावली होती.
कोविड-१९ साथीविरोधात रणनीती ठरविण्यासाठी एक मंत्रीस्तरीय समन्वय समूह स्थापन करण्यात आलेला असून, त्याचे नेतृत्व कॅनडाचे परराष्ट्रमंत्री करीत आहेत.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अधिकृत वक्तव्य जारी केल्यामुळे चिडलेल्या भारत सरकारने शुक्रवारी कॅनडाचे नवी दिल्लीतील राजदूत नादीर पटेल यांना बोलावून घेऊन आपली नाराजी कळविली होती.