क्रिप्टो करन्सीवर भारत घालणार बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 07:51 AM2021-01-31T07:51:20+5:302021-01-31T07:51:45+5:30
बिटकॉइनसह सर्व प्रकारच्या आभासी चलनांवर (क्रिप्टो करन्सी) बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक आणण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : बिटकॉइनसह सर्व प्रकारच्या आभासी चलनांवर (क्रिप्टो करन्सी) बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक आणण्यात येणार आहे. दरम्यान, आभासी चलनाचा मुकाबला करण्यासाठी रुपयाची डिजिटल आवृत्ती जारी करण्याचा विचार रिझर्व्ह बँकेने चालविला आहे. केंद्रीय बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) या नावाने ते ओळखले जाईल.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, बिटकॉइनसारख्या काही क्रिप्टोकरन्सी अथवा आभासी चलनांचे पारंपरिक चलनात रूपांतर करता येते. तथापि, सर्वच आभासी चलनांच्या बाबतीत ही सोय नाही. पारंपरिक चलनांना जसे त्या त्या देशाच्या केंद्रीय बँकांचे पाठबळ आणि नियमन प्राप्त असते, तसे आभासी चलनाला नसते. त्यामुळे ही चलने सामान्यांसाठी फसवणुकीचे मोठे साधन बनण्याचा धोका आहे.