भारत ठरला ग्लोबल लीडर, जी-२० परिषदेची यशस्वी सांगता; आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही कौतुक; पुढील अध्यक्षपद ब्राझीलकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 07:25 AM2023-09-11T07:25:23+5:302023-09-11T07:25:43+5:30
G20 Summit: जी-२० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे, हा भारताचा मोठा विजय ठरला.
- संजय शर्मा
नवी दिल्ली- जी-२० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे, हा भारताचा मोठा विजय ठरला. परिषदेच्या समारोपावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह त्यात स्थान देण्यासाठी भारताने आग्रही भूमिका मांडली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘एक वसुधा’, ‘एक कुटुंब’वर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी ‘एक भविष्य’वरील चर्चासत्रानंतर भारताने पुढील अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवले. परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत हा ग्लोबल लीडर असल्याचे सिद्ध झाले.
व्यापारवृद्धीसह आर्थिक विकास
दोनदिवसीय परिषदेसाठी आलेल्या जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींना भारतीय कला, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन झाले. परिषदेच्या माध्यमातून भारत-आखात-युरोप कॉरिडॉर, रेल्वे आणि शिपिंग कनेक्टिव्हिटी, ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सची निर्मिती करण्याचे निश्चित झाले. त्या माध्यमातून भारताच्या व्यापारवृद्धीसह आर्थिक विकासासाठी मदत होणार आहे.
भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय
भारताने आपल्या मुत्सद्देगिरीने जगातील दोन प्रमुख देश असलेल्या अमेरिका आणि रशियासोबत चांगले संबंध ठेवले. अमेरिकेचा हात सोबत घेताना रशियाचा हात मात्र भारताने सोडलेला नाही. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अनेक देशांनी भारताकडे नाराजी व्यक्त केली होती, परंतु कोणत्या देशाकडून तेल खरेदी करणे, हे ठरवण्याचा भारताला अधिकार असल्याचे पटवून दिले.
चीनला सूचक इशारा
नवी दिल्ली जाहीरनामा पारित झाल्याने चीनचा तळतळाट झाला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये चीन जी-२० ऐवजी ब्रिक्स संघटनेला महत्त्व देत असल्याचे म्हटले आहे. तसेच, भारत-आखात-युरोप रेल्वे-शिपिंग कनेक्टिव्हिटी प्रकल्पाची घोषणा हा चीनसाठी सूचक इशारा आहे.
अध्यक्षपदाचे प्रतीक असलेला वॉवेल सुपूर्द
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व राष्ट्रप्रमुखांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे भारत मंडपममध्ये आगमन झाले. त्यानंतर ‘एक भविष्य’वरील चर्चासत्रात पंतप्रधान मोदी यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या परिषदेचे यजमानपद ब्राझीलकडे सोपवले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपदाचे प्रतीक असलेला वॉवेल सुपूर्द केला.
भारताकडून जगाला शांतता आणि एकतेचा संदेश
एकीकडे रशियाकडून अजूनही युक्रेनवर हल्ले सुरू असताना, जी-२० चे अध्यक्ष या नात्याने भारताने जगाला एकता व शांततेचा संदेश देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. भारताने जी-२० चे अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. हे नाते द्विपक्षीय संबंधांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
- इमॅन्युएल मॅक्रॉन, राष्ट्राध्यक्ष, फ्रान्स
आर्थिक विकासात महत्त्वाचा भागीदार
भारत ही जगातील असामान्यपणे महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे आणि हवामान बदलाला तोंड देण्यासह आर्थिक विकास व अनेक क्षेत्रांत हा देश कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार आहे. कॅनडातील खलिस्तानी घटकांच्या वाढत्या कारवायांबद्दल भारताच्या चिंतेबद्दल विचारले असता, आम्ही नेहमीच शांततापूर्ण निषेधाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करू, परंतु हिंसाचारास प्रतिबंध करू, असेही ते म्हणाले.
- जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा
सहकार्यातून व्यापक क्षमतांचा वापर
भारत दक्षिण आशियातील आमचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देश त्यांच्यातील सहकार्याच्या व्यापक क्षमतांचा पुरेपूर उपयोग करतील. मी शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. या वर्षीच्या सुरुवातीला तुर्कीमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर आम्ही प्रामुख्याने अर्थव्यवस्था आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या क्षमतांचा वापर करण्यास सक्षम होऊ.
- रेसेप तय्यप एर्दोगन, राष्ट्राध्यक्ष, तुर्की
भारताच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब असे...
- भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉरची घोषणा, जी-२० मध्ये आफ्रिकी युनियनला स्थायी सदस्यत्व देणे आणि नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्वसंमती मिळणे हे परिषदेचे आणि पर्यायाने भारताचे मोठे यश म्हटले जात आहे.
- शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या परिषदेची विशेष दखल घेतली. त्यात भारतीय मुत्सद्देगिरीचे अप्रत्यक्षपणे कौतुक करण्यात आले.
- भारताने अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी, इटली, फ्रान्स, तुर्की, सौदी अरेबिया, आस्ट्रेलिया, कॅनडा आदी परस्परविरोधी देशांची नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सहमती मिळवणे, यावरून भारताचे जागतिक पातळीवर महत्त्व वाढले आहे.