लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:55 PM2021-06-28T23:55:46+5:302021-06-28T23:59:39+5:30
Rajnath Singh In Ladakh : भारत संवादातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवानांशी एका कार्यक्रमादरम्यान संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांनाही कठोर शब्दात संदेश दिला. "भारत हा कोणत्याही वादांवर चर्चेच्या मार्गातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवतो. परंतु जर भारताला उकसवलं किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही सहन केलं जाणार नाही," असं राजनाथ सिंग म्हणाले.
"भारत एक शांतताप्रिय देश आहे. भारत कधीही कोणावर आक्रमण करतच नाही. परंतु भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना योग्य ते उत्तर देण्यास भारत कायमच तयार आहे," असंही राजनाथ सिंह म्हणाले. "जर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर कोणत्याही वादावर तोडगा काढला जाऊ शकतो," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहिली.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh and armed forces' Jawans chorused 'Bharat Mata Ki Ji' at Leh.
— ANI (@ANI) June 28, 2021
He is on a 3-day visit to the Union Territory. pic.twitter.com/j7Z0mx9Rd8
भारत एकमेव देश ज्यानं...
"भारत हा जगातला एकमेव देश आहे ज्यानं ना कधी कोणत्या देशावर आक्रमण केलं, ना कोणत्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला. भारतानं कोणत्याही देशाकडे वाकड्या नंजरेनं पाहिलं नाही. परंतु आमच्याकडेही वाकड्या नजरेनं पाहणं आम्हाला मान्य नाही. आम्ही समस्येचं निराकरण करू इच्छितो," असंही ते म्हणाले. "शेजारी राष्ट्रांनी हा विचार केला पाहिजे आपण युगायुगांपासून शेजारी आहोत आणि अनेक युगांपर्यंत शेजारी राहू. आपण चर्चेच्या माध्यमातून समस्येवर तोडगा काढू शकतो का? मी सर्व शेजारी राष्ट्रांशी चर्चा करतआहे. आपण तोडगा काढू शकतो, परंतु इच्छाशक्ती साफ असली पाहिजे," असंही राजनाथ सिंह म्हणाले.