भारतातल्या 'या' राज्यात भुताच्या भीतीने अख्खं गाव झालं रिकामं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:32 PM2017-10-13T13:32:42+5:302017-10-13T13:34:43+5:30
भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे.
हैदराबाद - भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तेलंगणच्या निर्मल जिल्ह्यात कासीगुडा हे अख्ख गाव भूताच्या दहशतीने रिकामी झालं आहे. रात्रीच्या सुमारास एका महिलेचे भूत गावात भटकते असा इथल्या गावक-यांचा समज झाला आहे. या महिला भूताच्या दहशतीने संपूर्ण गाव ओस पडले आहे.
हे भूत फक्त पुरुषांना टार्गेट करते असा इथल्या गावक-यांचा दावा आहे. या गावचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कासीगुडा गावात एकूण 60 कुटुंबे राहतात. दगड फोडणे हा या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावकरी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात घर सोडून गेल्याने संपूर्ण गावात सन्नाटा पसरलेला दिसेल.
गावातील बहुतांश घरांना टाळी लागलेली असून कोणाचीही घरी परतण्याची हिम्मत नाही. जे गावकरी अजूनही गावात राहतायत ते अंधार पडण्यापूर्वी घरी परततात. सूर्य उगवण्यापूर्वी कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. तेलंगणमधल्या अनेक गावांमध्ये भुतांची दहशत आहे पण प्रथमच गावकरी मोठया संख्येने गाव सोडून गेल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.