मोठा निर्णय! भारत रशियाकडून घेणार ७० हजार असॉल्ट रायफल, अत्याधुनिक हेलिकॉप्टरवरही नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:53 AM2021-08-23T11:53:45+5:302021-08-23T11:54:13+5:30
भारत रशियाकडून लवकरच ७० हजार असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे.
भारत रशियाकडून लवकरच ७० हजार असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे. भारतानं आपत्कालीन खरेदी अंतर्गत रशियासोबत करार केला असून यात देशाच्या संरक्षण विभागाला आणखी मजबूत करण्यासाठी रशियाकडून ७० हजार असॉल्ट रायफल खरेदी करण्यात येणार आहेत. यातील बहुतांश रायफल्स हवाई दलासाठी खरेदी करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (India to buy 70,000 assault rifles from Russia)
असॉल्ट रायफलसोबतच रशियाकडून Ka-226T हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचाही भारतीय संरक्षण विभागाचा इरादा आहे. भारतीय हवाई दलातील हेलिकॉप्टर्सची कमतरता भरुन काढण्यासाठी रशियासोबत करार केला जाणार आहे. "भारत आणि रशियामध्ये ७० हजार असॉल्ट रायफलसाठी करार झाला असून पहिल्या टप्प्यातील पेमेंट प्राप्त झाल्यानंतर रशियाकडून येत्या तीन महिन्यांत रायफलची डिलिव्हरी सुरू होईल. पुढील सहा महिन्यांत ७० हजार रायफल भारताला सुपूर्द करण्यात येतील", अशी माहिती भारत आणि रशियातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खरंतर २०१९ साली भारतानं रशियासोबत अमेठी येथील ऑर्डिन्सस फॅक्टरीमध्ये साडेसात लाख एके-२०३ रायफल निर्मितीसाठीचा करार केला होता. पण या प्लांटमध्ये अद्याप रायफल निर्मितीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत या प्लांटचं उदघाटन केलं होतं.