मालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:45 PM2018-10-16T22:45:04+5:302018-10-16T22:45:17+5:30
सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे.
नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला असून, यामीन यांनी सत्ता न सोडल्यास लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारताकडून हस्तक्षेप होण्याचीही शक्यता आहे. तसेच निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही यामिन यांनी सत्ता न सोडल्यास त्यांना कठोर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिका आणि युरोपियन देशांनी दिला आहे.
मालदीवमधील परिस्थितीवर भारताची नजर असून, गरज पडल्यास योग्य पावले उचलण्यात येतील, असे भारताने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक निर्बंधांसोबतच अन्य पर्यायांसदर्भात आंतरराष्ट्रीय समुदाय विचार करत आहे. यामध्ये भारताचाही सक्रीय सहभाग असणार आहे. मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोहील यांनी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभूत केले होते. मात्रा यामीन यांना अद्याप सत्ता सोडलेली नाही. तसेच त्यांनी निवडणुकीतील निकालालाही न्यायालयात आव्हान दिले आहे.
दरम्यान, मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.