'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी मिळूनही भारत स्वच्छ करु शकत नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:17 PM2017-10-02T15:17:45+5:302017-10-02T15:19:31+5:30
स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे
नवी दिल्ली - स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, 'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी जरी आले तरी हे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही'. 'स्वच्छता मोहीम फक्त सरकार किंवा महात्मा गांधींचं आंदोलन राहिलेलं नाही, देशातील सामान्य नागरिकांनी हे आंदोलन आपल्या खांद्यावर घेतलं आहे', असं नरेंद्र मोदी बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशवासियांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करत सांगितलं की, 'जर एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारांनी एकत्र प्रयत्न केला तरी स्वच्छतेचं स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. पण जर 125 कोटी देशवासी एकत्र आले, तर पाहता पाहता हे स्वप्न पुर्ण होऊन जाईल'. आपण हे बोलल्यानंतर आपली धुलाई होऊ शकते असं मिश्किलपणे सांगत देशवासियांसमोर तथ्य ठेवणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी बोलले.
#SwachhIndia wont come true even if 1000 Mahatma Gandhis, 1lakh Narendra Modis, all CMs&gvts come together,it'll be done by 125cr Indians-PM pic.twitter.com/xIk6NtvIqC
— ANI (@ANI) October 2, 2017
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरही टीका केली. 'मोदीला शिव्या देण्यासाठी खूप विषय आहेत. मात्र समाजाला जागरुक करण्यासाठी होणा-या कार्यक्रमांमध्ये राजकारण आणता कामा नये. समाजात परिवर्तन घडवणा-या विषयांची खिल्ली उडवली जाऊ नये', असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
India faces challenges but that does not mean we run away from them. We will face them and work to overcome them: PM Modi in Delhi pic.twitter.com/LsGCnSmYeg
— ANI (@ANI) October 2, 2017
महात्मा गांधींचा मार्ग चुकीचा असू शकत नाही
टीका होत असतानाही सरकार स्वच्छता मोहिमेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते बोललेत की, 'तीन वर्ष आम्ही हे काम करत आहोत, कारण बापूंनी जो रस्ता सांगितला तो चुकीचा असू शकत नाही. आव्हानं आहेत, पण आव्हानं आहेत म्हणून देशाला ज्या परिस्थितीत आहे तसंच ठेवलं जाऊ शकत नाही. ज्या गोष्टी केल्यानंतर आपली स्तुती होईल, उदोउदो होईल अशाच गोष्टींना आपण हात लावायचा का ?'.