जुमल्यावर देश चालविता येत नाही : सिसोदिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:43 AM2018-07-24T01:43:37+5:302018-07-24T01:44:18+5:30
देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.
पणजी : मागची लोकसभा निवडणूक ही जुमल्यावर लढवली गेली; परंतु देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. मडगाव (गोवा) येथे शैक्षणिक परिसंवादामध्ये सहभागासाठी ते आले आहेत. सोमवारी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गांधीजींचा चष्म्याचे प्रतीक वापरून देश स्वच्छ होत असतो, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
पंतप्रधान मोदी विकासाचे बोलतात; परंतु वास्तव वेगळेच आहे, असे त्यांनी सांगितले. साधे स्वच्छतेचे उदाहरण घ्या, देशात तुम्ही कोठेही जा, वास्तव वेगळे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी ही अत्यंत चांगली संकल्पना; मात्र त्याची अंमलबजावणी अत्यंत वाईट पद्धतीने केली गेली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एका वर्षात जीएसटीच्या नियमांत पन्नास दुरुस्त्या केल्या गेल्या. खरे तर देशासाठी व्यवहार्य जीएसटी गरजेची आहे, असे ते म्हणाले. सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागू करू नये, असे मी जीएसटीसंदर्भातील बैठकीत सांगितले होते. प्रत्यक्षात एक वर्षाने सॅनिटरी नॅपकिन्सना जीएसटीतून वगळले गेले. जीएसटीमुळे व्यापाराची प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा होती; प्रत्यक्षात उद्योग जगत घाबरून आहे. डिजिटलायझेशन वगैरे मोदी बोलतात; पण देशभरातील वास्तव वेगळेच आहे, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.