LAC ओलांडून भटकत सीमेच्या आत आले 13 याक, भारतीय सैन्यांनी चीनच्या केले स्वाधीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:13 PM2020-09-08T14:13:23+5:302020-09-08T14:14:04+5:30
भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले.
सोमवारी भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडने एक अत्यंत कौतुकास्पद गोष्टीची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) दुसर्या बाजूला म्हणजेच चिनी बाजूने भटकत असलेली काही याक आणि त्यांच्या बछड्यांनी भारतीय सीमेच्या हद्दीत प्रवेश केला, त्यानंतर भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले. ईस्टर्न कमांडने सांगितले की, चिनी अधिका-यांनी 'संवेदनशील वृत्ती' दाखविल्याबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.
ईस्टर्न कमांडच्या एका ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की, 'मानवतावादाच्या जोरावर भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामंगच्या LACच्या पलीकडे सीमेवरून आलेल्या 13 याक आणि चार वासरे 7 सप्टेंबर रोजी चीनच्या ताब्यात दिली. यावेळी उपस्थित चिनी अधिका-यांनी भारतीय सैन्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानले.
भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाखच्या सीमेवर LACवरून तणाव आहे. सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे शुक्रवारी लडाख येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले. ते म्हणाले की, दोन्ही देश लष्करी व मुत्सद्दी चर्चेद्वारे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अलीकडे भारताने पँगॉग तलावाच्या दक्षिणेकडील किना-यावर आक्रमक चिनी सैन्याच्या कारवाया रोखल्या. चिनी सैन्याने चुशूलजवळील पँगॉग त्सो येथील पॅंगॉग तलावाच्या दक्षिण किना-याजवळील भारतीय भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.
चीनमधील घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे एप्रिल-मेपासून भारत आणि चीनला LACवर तणाव येत आहे. फिंगर एरिया, गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग्ज आणि कोंगरुआंग नाला भागात चीनशी तणाव आहे. परिस्थिती अधिक गंभीर बनली जेव्हा जून महिन्यात, गलवान खो-यात दोन देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आणि 20 भारतीय जवानांना यात वीरमरण आले. 40हून अधिक चिनी सैनिकही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, परंतु याबाबत कोणतीही खात्री पटलेली नाही.