भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:34 PM2024-10-22T16:34:27+5:302024-10-22T16:35:47+5:30
India China Border Dispute : भारत आणि चीनमधील LAC वर सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे.
India China Border Dispute : भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद आता अखेर संपला आहे. चीननेभारताशी 'गस्त करार' करण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, या गस्त करारानंतर भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लष्करप्रमुख म्हणाले की, या कराराला चीनने सहमती दर्शवली असून, सीमेवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.
दोन्ही देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, चीन आणि भारताने सीमेशी संबंधित मुद्द्यांवर अनेक राजनैतिक आणि लष्करी चर्चा केल्या. आता दोन्ही बाजूंनी संबंधित विषयांवर एक ठराव केला आहे. चीन याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतासोबत काम करेल.
#WATCH | Delhi: COAS Gen Upendra Dwivedi says, "We want to go back to the status quo of April 2020. Thereafter we will be looking at disengagement, de-escalation and normal management of LAC... This has been our stand since April 2020. As of now, we are trying to restore the… pic.twitter.com/jASAklyN2N
— ANI (@ANI) October 22, 2024
पंतप्रधान मोदी शी जिनपिंग यांची भेट घेऊ शकतात
BRICS परिषद 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रशियाच्या कझान शहरात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची येथे भेट होण्याची शक्यता आहे. मात्र, द्विपक्षीय बैठकीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सीमावाद सोडवण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.
काय आहे हा करार ?
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी सांगितले होते की, गेल्या अनेक आठवड्यांपासून दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर लडाखमध्ये पेट्रोलिंग करार झाला आहे. यामुळे 2020 पासून सुरू झालेला भारत-चीन सीमावाद संपण्यास मदत मिळेल. दरम्यान, या करारामुळे डेपसांग आणि डेमचोकमध्ये दोन्ही देशांची गस्त सुरू होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, या करारामुळे LAC वर 2020 पूर्वीप्रमाणे शांतता प्रस्थापित होईल.