चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:23 PM2022-12-13T17:23:29+5:302022-12-13T17:27:59+5:30

चीनकडून झालेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर

India China Border Tawang clash Arunachal Pradesh Omar Abdullah remembered former PM Atal Bihari Vajpayee said this for modi government | चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

Next

India China Border Tawang clash: अरुणाचल प्रदेशमध्ये LAC जवळील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या अयशस्वी प्रयत्नावरून वाद वाढत आहे. केंद्र सरकारवर पुन्हा एकदा विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. चीनचा अतिक्रमणाचा प्रयत्न म्हणजे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे विरोधकांकडून सातत्याने बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांवरून त्यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. त्याच वेळी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करून देत अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला एक सल्ला दिला.

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो हे दुर्दैवी असल्याचे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानसोबतच्या आमच्या संबंधांचे सत्य कोणापासून लपलेले नाही. चीनसोबतही सलोख्याचे संबंध प्रस्थापित होत नसल्याचे अनेक गोष्टींमधून दिसत आहे. आतापर्यंत चिनी सैनिकांनी लडाखमधून पूर्णपणे माघार घेतलेली नाही आणि आज अरुणाचल प्रदेशातही अतिक्रमणाच्या हालचाली घडल्यात. ही बाब चिंताजनक असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांची झाली आठवण

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून त्यांनी त्यांच्याच ओळी सांगितल्या आणि मोदी सरकारला सल्ला दिला. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की 'मित्र बदलता येतात पण शेजारी नाही.' आपण आपले शेजारी बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवू शकतो. टाळी एका हाताने वाजत नाही, दोन हातांनी वाजते. आपल्याशी चांगले संबंध ठेवणे आणि अशा कारवाया थांबवणे ही चीनचीही जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

"या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झालेला नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने त्यांच्या स्थानांवरूनच माघार घेतली," असे राजनाथ सिंह म्हणाले.

Web Title: India China Border Tawang clash Arunachal Pradesh Omar Abdullah remembered former PM Atal Bihari Vajpayee said this for modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.