India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:10 PM2022-12-13T19:10:19+5:302022-12-13T19:10:55+5:30
India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे.
India-China Conflict: 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. चीनकडून सीमेवर घुसखोरीची कारवाई अनेकदा सुरू असते. यासोबतच चीनकडून भारतातील इंटरनेट व्यवस्थेवर सायबर हल्ले होत असतात. अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(एम्स)चा सर्व्हर हॅक झाला होता. हा चीनचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संस्थेतील महत्त्वाच्या लोकांचा डेटा त्यांनी डार्क वेबवर टाकला होता.
सरकारकडून SOP जारी
चीनचा हा उद्दामपणा पाहून भारतही सतर्क झाला आहे. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, त्यांनी आपल्या मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) च्या कर्मचार्यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल-एसओपी जारी केला आहे. याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
SOP म्हणजे काय?
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजे काही काम करण्याचे मानक किंवा मान्यताप्राप्त मार्ग. चीनकडून सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा सामना करणाऱ्या भारताने इंटरनेट आणि कॉम्प्युटर वापरण्याच्या योग्य किंवा प्रमाणित पद्धतींबाबत ही SOP जारी केली आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका मजबूत करण्यासाठी आणि मोठे नुकसान टाळण्यासाठी कडक देखरेखीसाठी अशी पावले उचलली आहेत.
ही कामे करावी लागतील
या अंतर्गत, सरकारने विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) मधील कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळण्यास सांगितले आहे. यामध्ये मूलभूत आयटी कायदे लक्षात ठेवणे, वापरल्यानंतर संगणक बंद करणे, ईमेल साइन आउट करणे, वेळोवेळी पासवर्ड अपडेट करणे यांचा समावेश आहे.
...तर कारवाई होणार
या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्समध्ये सायबर हल्ल्याचे मुख्य कारण एका कर्मचाऱ्याने येथे अशी खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. एम्समधील कर्मचारी सहसा त्यांचे संगणक बंद करत नाहीत किंवा त्यांच्या ईमेल खात्यातून साइन आउट करत नाहीत. त्यामुळे हॅकर्सना एम्सच्या सर्व्हरवर हल्ला करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.