India China Conflict: भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:55 AM2022-12-14T08:55:24+5:302022-12-14T09:36:44+5:30
India China Conflict: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे
नवी दिल्ली - आधीच तणावपूर्ण असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहे. ९ डिसेंबर रोजी ही हिंसक झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असतानाच या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. तसेच भारतीय जवानांनी इंगा दाखवल्यानंतर घुसखोर चिनी सैनिकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे.
भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करण्याचा चीनचा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेवरून चिंता व्यक्त होत असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओला अद्याप लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडीओ जुना असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ धडाक्याने व्हायरल होत आहे. भारताच्या जवानांनी घेतलेल्या रुद्रावतारामुळे घुसखोर चिनी सैनिक बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. तर भारताचे जवान त्यांना बडवून काढताना दिसत आहेत.
ये भारतीय सैनिक हैं और जो पिट रहे हैं वो दुश्मन हैं- pic.twitter.com/vuXxbP4KGE
— Rubika Liyaquat (@RubikaLiyaquat) December 13, 2022
दरम्यान, ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणाले की, चिनी सैन्याने ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडले. या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे.