...म्हणून 100% मेड इन इंडिया मोबाईल सध्या अशक्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:09 AM2020-06-20T06:09:12+5:302020-06-20T06:10:53+5:30
भारतीय भागीदारीला दूर करून चिनी कंपन्यांचा बाजारावर कब्जा
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांना विरोध वाढला आहे. सोशल मीडियातून स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.
मेक इन इंडियाने फायदा
हा बदल सरकारच्या कर धोरणामुळे झाला. चीनमधून तयार फोनची आयात केल्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लावले जायचे. सुटे भाग आयात करून एसईजेमध्ये फोन तयार केल्यावर फक्त एक टक्का कर द्यावा लागायचा. याच कारणामुळे शाओमी, विवो आणि ओप्पोसारखे दिग्गज चिनी ब्रँडस्देखील आपले फोन मेक इन इंडियांतर्गत भारतात तयार करीत आहेत. प्रोसेसर, डिस्प्ले, रॅम आणि मदरबोर्ड व दुसरे सुटे भाग चीनकडूनच आयात केले जात आहेत.
गेल्या काही वर्षांत स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पूर्णपणे स्वदेशी स्मार्टफोन आणि टीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने अजून फार दूर आहेत. अमेरिकन आयफोन असो की कोरियन सॅमसंग किंवा भारतीय ब्रँडचा मायक्रोमॅक्स आणि लावा भारतात बाजारात विकला जाणारा कोणताही फोन पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी की, मेक इन इंडियाच्या ब्रँडिंगसोबत बाजारात असलेल्या बड्या ब्रँडचे फोन चीनमधून आयात केलेल्या सुट्या भागांतूनच बनविले जात आहेत. आज शाओमी, ओप्पो, रियलमी, वनप्लस, विवो, हवाई, लेनेवो, मोटोरोला, टेक्नो आणि इन्फिनिक्ससारख्या चिनी ब्रँडस्ने आज भारतीय बाजारातील 72% व्यवसाय बळकावला आहे.
चिनी कंपन्यांची घुसखोरी
2013 नंतर अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात असलेल्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्ससारख्या भारतीय ब्रँडमधील हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. त्या आधीपर्यंत त्या चीनहून सुटे भाग मागवून भारतात फोन तयार करायच्या किंवा चीनमधून तयार फोन आयात करून आपल्या ब्रँडसोबत देशी बाजारात विकत होत्या. परंतु २०१३ नंतर भारतीय ब्रँडसाठी फोन बनविणे बंद करून चिनी कंपन्या भारतात दाखल झाल्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरण
मायक्रोमॅक्स आहे.
2014 मध्ये हा भारतीय ब्रँड देशी बाजारातील १८ टक्के मागणी चीनची उपकरणे विकून पूर्ण करीत होता. परंतु आज त्याची हिस्सेदारी एक टक्का आहे. त्याच्यासाठी उपकरणे बनविणाºया टॉपवाईजने तिच्याशी संबंध तोडून कोमियो नावाने भारतात आपला ब्रँड सादर केला.
2014 मध्ये भारतात फक्त १९ हजार कोटी रुपयांचे फोन तयार केले जात होते. परंतु मेक इन इंडियांतर्गत येत्या दोन वर्षांत ही उलाढाल ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली होती.
रोजगाराची मोठी संधी
भारतात फोनची जुळणी करण्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. चिनी ब्रँडस् रियलमीने नुकताच दावा केला की, आम्ही दहा हजार लोकांना रोजगार देऊ आणि 50 टक्के सुट्या भागांचे उत्पादनही भारतात करू. शाओमीनेदेखील तिच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये ९० टक्के महिलांना रोजगार देऊ असे म्हटले. शाओमी आणि अॅप्पलसाठी फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉनच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगनेदेखील नोएडात आपला सगळ्यात मोठा मोबाईल कारखाना सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे.