India China Face Off: भारताच्या चोख प्रत्युत्तरात चीनचे ३५ सैनिक जखमी वा मृत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:48 AM2020-06-18T02:48:37+5:302020-06-18T02:49:16+5:30
अमेरिकी गुप्तचर यंत्रणांची माहिती; मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू
नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिक
गंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
भारत व चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. गेल्या पाच दशकांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये इतकी मोठी चकमक पहिल्यांदाच घडली आहे. या घटनेनंतर गलवान खोºयातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
गलवानमधील संघर्षात चीनचे किती सैनिक मारले गेले याबाबत अजून त्या देशाने कोणतीही माहिती दिलेली नाही. भारताइतकीच चीनचीही हानी झाली असून त्यांचे किती सैनिक मारले गेले याबद्दलची ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. लडाखच्या पूर्व भागात असलेल्या गलवान खोºयातील परिस्थितीचा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी आढावा घेतला.
चीनशी झालेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याशी मंगळवारी रात्री एका बैठकीत सविस्तर चर्चा केली.