India China Face Off: चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:14 PM2020-06-22T13:14:51+5:302020-06-22T13:18:08+5:30
India China Face Off: सीमावर्ती भागातील हवाई दलाच्या तळांवर अतिरिक्त विमानं, हेलिकॉप्टर्स तैनात
पेइचिंग: गेल्या आठवड्यात गलवान भागात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील हालचाली वाढल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे लष्कराला अधिकचे अधिकार मिळाले आहेत. लेहमध्ये मिग-२९ विमानं आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यानंतर चिनी सैन्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीननं लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत.
होटान, नग्यारी, शिगात्से (सिक्कीमजवळ) आणि नयिंगची (अरुणाचल प्रदेशजवळ) हवाई तळांवर चीननं मोठ्या संख्येनं हवाई दल सज्ज ठेवलं आहे. लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स सीमारेषेच्या जवळ आणून ठेवली गेली आहेत. पँगाँग तलावाजवळील फिंगर ४ भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांना रोखण्यासाठी चीननं आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या भागात चीननं गस्तीवरील जवानांची संख्या वाढवली आहे.
भारताला लागून असलेल्या सीमेवर चीननं हवाई दलाच्या हालचाली वाढवल्याचं वृत्त द ट्रिब्यूननं दिलं आहे. होटान, नग्यारी, शिगात्से आणि नयिंगचीमधील हवाई तळांवर अतिरिक्त लढाऊ विमानं, बॉम्बफेक करणारी विमानं आणि हेलिकॉप्टर्स कारवाईसाठी सज्ज ठेवली गेली आहेत. पँगाँग तलाव परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा चीनचा मानस आहे. त्यासाठीही चीननं तयारी सुरू केली आहे. गोगरा हॉट स्प्रिंग भागात चीननं फौजफाटा वाढवला आहे.
चिनी सैन्यानं सीमावर्ती भागात असणाऱ्या हवाई तळांवर अतिरिक्त विमानं आणि हेलिकॉप्टर्स तैनाक केल्यानं भारताला असलेला धोका वाढला आहे. भारतीय हद्दीतील देपसांग, मुर्गो, गलवान, हॉट स्प्रिंग, कोयूल, फुकचे आणि देमचोक चीनपासून जवळ आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींमुळे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या सैन्याचे कमांडर आज चर्चा करणार आहेत. याआधी ६ जूनला अशाच प्रकारची चर्चा झाली होती.
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा
तुमच्या बाजूनं एकही गोळी झाडली गेली तर...; चीनची भारताला थेट धमकी