India China Face Off: कठोर वाटाघाटीनंतर चीनकडून १० भारतीय जवानांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:56 AM2020-06-20T05:56:42+5:302020-06-20T05:56:53+5:30
दोन अधिकाऱ्यांचा समावेश; हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी घेतले होते ताब्यात
नवी दिल्ली : भारत आणि चिनी मुत्सद्दी तसेच सैनिकांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या वाटाघाटीच्या तीन फेºयानंतर चीनने भारताच्या १० जवानांना सोडून दिले आहे. दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांची सुरक्षा लक्षात घेता या वाटाघाटी अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आल्या. या भारतीय जवानांना १५ जून रोजी गलवान खोºयात झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले होते.
याबाबत नाव न सांगण्याच्या एका अधिकाºयाने सांगितले की, भारताला परत केलेल्या या १० जवानांमध्ये दोन अधिकाºयांचा समावेश आहे. हिंसक झटापटीनंतर यांना तीन दिवसांनी भारताला सोपविण्यात आले आहे. परंतु याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. भारताने म्हटले होते की, या झटापटीत एकही भारतीय जवान हरवलेला नाही. या १० जवानांना सोडून देण्याआधी झालेल्या वाटाघाटी गलवान खोºयात पेट्रोलिंग पॉइंट १४ येथे पार पडल्या. (वृत्तसंस्था)
तीन दिवस झाल्या वाटाघाटी
मंगळवार ते गुरुवारपर्यंत चाललेल्या वाटाघाटीत भारताच्या वतीने मेजर जनरल अभिजित बापट आणि याच दर्जाचे चिनी लष्करी अधिकारी सामील झाले. गुरुवारी यांच्यात वाटाघाटीची तिसरी फेरी पार पडली. झालेल्या वाटाघाटी सध्या सैन्य परत घेण्याच्या सुरूअसलेल्या प्रक्रियेचाच एक भाग होत्या. दोन देशांमध्ये सीमांवर झालेल्या वादानंतर मेच्या सुरुवातीपासून हे लष्करी अधिकारी सातव्यांदा भेटत आहेत. सुटका झालेल्या 10 जवानांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. चीनने अद्यापही त्यांच्या सैन्यातील कुणीही ठार झाले किंवा जखमी झाले हे मान्य केलेले नाही. परंतु भारताच्या लष्करी अधिकाºयांनी 43 चिनी सैनिक ठार झाले किंवा गंभीर जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी भारताचे ७६ जवान जखमी झाल्याचे बोलले जात आहे.