India China Face Off: चीन नरमला, तणाव निवळला; सैन्य माघारीवरून दोघांत सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:56 AM2020-06-24T05:56:22+5:302020-06-24T05:57:12+5:30
प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.
नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर हाणामारी होऊन तणावास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांच्यात सहमती झाली. चीनने नरमाई दाखवल्याने दोन्ही देशांमधील तणाव निवळला. ६ जूनला अशीच सहमती झाली होती. पण नंतर प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.
गलवान खो-यातील पॅट्रोलिंग पॉइंट १४ व १५, गोगराच्या पॅट्रोलिंग पॉइंट १७ ए , हॉटस्प्रिंग, फिंगर ४ तसेच पॅनगाँग त्सो सरोवर ही वादाची प्रमुख ठिकाणे आहेत. येथून दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे ठरले तरी त्याला काही दिवस लागतील. त्याचा तपशील ठरविण्यासाठी बैठका होतील आणि माघारीचे काम टप्प्याटप्प्याने होईल.
>‘जैसे थे’ स्थितीसाठी भारताचा आग्रह
सीमेवर ६ जूनच्या आधीची ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा भारताने बैठकीत आग्रह धरला. तसेच सैन्य केवळ माघारी न घेता गेल्या काही आठवड्यांत सैन्य तुकड्या व अवजड युद्धसामुग्रीची सीमेजवळ केलेली जमवाजवही पूर्वीच्या पातळीवर आणण्यावर भारताने भर दिला. आधीच्या बैठकीत झालेल्या सहमतीचे चिनी सैन्याकडून उल्लंघन झाल्यानेच गलवान खोºयातील दुर्दैवी घटना घडली, हेही भारताने चीनला ठासून सांगितले.
>११ तास चालली बैठक
सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ११ तासांच्या बैठकीत सहमती झाली. भारताकडून यात लेफ्ट. जनरल हरिंदर सिंह या बैठकीत व चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन चर्चेत सहभागी होते.
>लष्करप्रमुख नरवणे लडाख सीमेवर
लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख भेटीसाठी मंगळवारी दुपारी लेह येथे पोहोचले. तिथे लष्करी तुकड्यांच्या कमांडरांसोबत चर्चा करून, ते प्रत्यक्ष सीमेवर स्थितीचा आढावा घेतील. सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर लष्करप्रमुखांनी सीमेवर जाण्याची ही दुसरी वेळ असेल. लेहला येण्यापूर्वी लष्करप्रमुखांनी सर्व लष्करी कमांडरांची बैठक घेऊन सीमेवरील स्थिती व सैन्यसज्जता याचा आढावा घेतला होता. गेल्या आठवड्यात हवाईदल प्रमुख आर. के. एस. भादुरिया यांनीही सीमेलगतच्या लेह व श्रीनगर हवाईतळांना भेट दिली होती. त्यानंतर हवाईदलाची अनेक लढाऊ विमाने सीमेवर तैनात करण्यात आली.