India China Face Off: जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:52 AM2020-06-22T09:52:35+5:302020-06-22T09:54:59+5:30
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; एस-४०० लवकर सोपवण्याची मागणी करणार
नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत-चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. यासोबतच आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. जुना मित्र असलेल्या रशियासोबत भारतानं क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा एस-४०० साठी करार केला होता. ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारतानं प्रयत्न केले आहेत.
२०१८ मध्ये भारतानं एस-४०० साठी रशियासोबत ५ अब्ज डॉलरचा करार केला. कोरोनाचं संकट आल्यानं एस-४०० यंत्रणा मिळण्यास विलंब होत आहे. ही यंत्रणा डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. सैन्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चीनसोबत उडालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाचं संकट असल्यानं सध्याच्या घडीला मंत्री परदेश दौरे टाळत आहेत. मात्र तरीही सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सिंह चीनसाठी रवाना होत आहेत. सिंह यांचा रशिया दौरा तीन दिवसांचा असेल. एस-४०० क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर देण्यात यावी, असा आग्रह सिंह यांच्याकडून रशियाकडे करण्यात येणार आहे. भारतानं गेल्याच वर्षी एस-४०० साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-४०० यंत्रणा आहे.
चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं अधिकाधिक शस्त्रास्त्र सज्ज होण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ देऊन एस-४०० यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत.