India China Face Off: मोदी यांनी सत्य परिस्थिती देशाला सांगावी; विरोधकांची जोरदार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:59 AM2020-06-18T02:59:47+5:302020-06-18T03:00:28+5:30
विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांवरून सगळे विरोधक एका स्वरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्न विचारत आहेत. विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले. मोदी म्हणाले की, तरीही आम्हाला शांतता हवी आहे.
मोदी यांच्या या वक्तव्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मोदी यांंनी हे स्पष्टपणे हे देशाला सांगावे की, सीमेवर परिस्थिती काय आहे? त्या आधी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी यांना विचारले होते की, चीनने आमच्या भूभागावर ताबा कसा मिळवला? २० जवानांचे हौतात्म्य का झाले? घटनास्थळी आज काय परिस्थिती आहे? आमचे सैन्य अधिकारी आणि जवान अजूनही बेपत्ता आहेत का? किती सैनिक गंभीर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर ताबा मिळवला, याची उत्तरे सरकारने द्यावीत.
मोदी यांच्या वक्तव्यानंतरही काँगे्रस विचारत आहे की, जे प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले त्यांचे मोदी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांनुसार सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन याच प्रश्नांची उत्तरे सरकारकडे मागेल.
लडाख प्रकरणावरून मंगळवारपासूनच सरकार प्रश्नांनी घेरले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मोदी यांना विचारले की ‘पंतप्रधान गप्प का आहेत, ते लपून का बसले आहेत, फार झाले, काय झाले हे आम्हाला माहिती करून घ्यायचे आहे.’
चीनने कशी हिंमत केली की, आमचे जवान मृत्यू पावले. त्याची हिंमत कशी झाली की, आमची जमीन त्याने कब्ज्यात घेतली? राहुल यांनी मोदी यांच्या मौनावर प्रश्न विचारल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही म्हटले की, सरकारला प्रश्न विचारावेत तर त्याला राष्ट्रविरोधी घोषित केले जाते. पंतप्रधानांनी हे सांगायला हवे की, परिस्थिती काय आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी शहीद झालेल्या सैनिकांबद्दल सहवेदना व्यक्त करताना म्हटले की, सीमेवर काय परिस्थिती आहे, हे कोणालाच माहिती नाही व सरकारही त्याविषयी सांगत नाही. त्यांचे थेट लक्ष्य होते ते मोदी यांनी मौन सोडावे. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनी सरकारला विचारले की, जेव्हा वाद कमी करण्याचा प्रयत्न होत होता, तर आमचे सैनिक कसे मारले गेले? देशाचे हित यात आहे की, मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी प्रामाणिकपणे वस्तुस्थिती देशाला सांगावी.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोने औपचारिक निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली की, पूर्व लडाखमधील घटनाक्रमावर पूर्ण जबाबदारीने निवेदन केले जावे. पक्षाने सरकारने बाळगलेल्या मौनावरही प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘आमची धरणी माता, आमचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. आमचे जवान शहीद होत असताना आम्ही गप्प बसून राहावे? भारतीय जनतेला सत्य समजलेच पाहिजे.’ काँग्रेसच्या अध्यक्षांकडून पक्षाने औपचारिक निवेदन जारी करून देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेस सरकारसोबत उभी आहे; परंतु मोदी यांनी सत्य सांगितले पाहिजे. सगळ्यांना विश्वासातही घेतले पाहिजे, असे त्यात म्हटले.
शहीद झालेले जवान
कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद), नायब सुभेदार नुदुराम सोरेन (मयूरभंज), नायब सुभेदार मनदीप सिंग (पटियाला), नायब सुभेदार सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के. पलानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पाटणा), हवालदार बिपुल राय (मेरठ शहर), जवान दीपक कुमार (रेवा), राजेश ओरांग (बिरघुम), कुंदन कुमार ओझा (साहिबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांत प्रधान (कंधामल), अंकुश (हमीरपूर), गुरबिंदर (संगरूर), गुरतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (सहारसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंह (वैशाली), गणेश हंसदा (पूर्व सिंघभूम)