India China FaceOff: पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:04 IST2020-09-02T13:58:26+5:302020-09-02T14:04:05+5:30
India China FaceOff: भारतीय सैन्याचं चीनला त्यांच्याच पद्धतीनं चोख प्रत्युत्तर

India China FaceOff: पँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलं
नवी दिल्ली/लडाख: पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव चार महिन्यांपासून कायम आहे. चीननं तीन दिवसांत दोनदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले. मात्र भारतीय जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. यानंतर आता भारतीय जवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला असलेल्या सर्व डोंगरांवर कब्जा केला आहे. न्यूज १८ नं लष्करातील सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ब्लॅक टॉपसाठी चीनचा आटापिटा; तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न; जाणून घ्या महत्त्व
पँगाँग सरोवरच्या दक्षिणेला असलेल्या सर्व डोंगराळ भागांत आता भारतीय लष्कराचं वर्चस्व आहे. यामध्ये ब्लॅक टॉपचादेखील समावेश आहे. ब्लॅक टॉपचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनकडून सातत्यानं बैठका सुरू आहेत. मात्र एका बाजूला चर्चा सुरू असताना चीनच्या कारवाया सुरूच आहेत. त्यामुळेच आता भारतानं चीनला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारतानंही चर्चा सुरू असताना आक्रमकता दाखवत पँगाँगमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले
'चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वादग्रस्त भागांमधून माघार घेण्याबद्दल सहमती झाली होती. मात्र संवाद सुरू ठेवून चीनला वादग्रस्त भागांवर कब्जा करायचा आहे. चीनचा हा कावा ओळखून भारतानं आधीच महत्त्वाच्या डोंगरांवर कब्जा करण्याची योजना आखली. त्यामुळे आता पँगाँगच्या दक्षिणेला असलेल्या डोंगराळ भागांमध्ये भारतानं वर्चस्व निर्माण केलं आहे,' अशी माहिती लष्करातील उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे.
पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले
पूर्व लडाखमधील तणाव वाढल्याचं सुत्रांनी सांगितलं. 'आम्ही त्यांच्या (चीनच्या) भागात प्रवेश केलेला नाही. मात्र आमच्या चौक्या असलेल्या परिसराच्या आसपास चिनी सैनिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे,' अशी माहिती सुत्रांनी दिली. आम्ही देशाच्या सीमांचं रक्षण करण्यास कटिबद्ध आहोत. चीन आता तरी तणाव निवळण्यासाठी सकारात्मक पावलं उचलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.