India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले
By बाळकृष्ण परब | Published: January 9, 2021 03:24 PM2021-01-09T15:24:04+5:302021-01-09T15:27:54+5:30
India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे.
लडाख - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. कडाक्याच्या थंडीतही दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. चुशूल विभागातील गुरूंग खोऱ्याजवळील सीमेवरून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले आहे. दरम्यान, आपण रस्ता भटकून भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या चिनी सैनिकाने केला आहे.
सध्या भारतीय लष्कराकडून या चिनी जवानाची चौकशी सुरू आहे. अधिक चौकशीमधून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच या चिनी सैनिकाला चीनच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी लडाखमधील एलएसीजवळ भारतीय सीमेच्या आत चीनचा एक सैनिक पकडला गेला. या चिनी सैनिकाला पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याच्या भागात पकडण्यात आले. या सैनिकाने दिलेल्या जाबाबावर विश्वास ठेवल्यास त्याने आपण रस्ता चुकून भारताच्या हद्दीत आल्याचे म्हटले आहे. मात्र त्याने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारताच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.
२०२०च्या पूर्वार्धापासून एलएसीच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे. आता या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध सध्या सुरू आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार जर भारतीय लष्कराकडून करण्यात येणाऱ्या तपासात चिनी सैनिकांने केलेला दावा खरा असल्याचे सिद्ध झाले तरच त्याला सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल.