India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:51 AM2020-07-07T07:51:27+5:302020-07-07T07:53:19+5:30
चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला.
नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रविवारी झालेल्या टेलिफोन संवादानंतर चीनने एलएसीवरील सैनिक मागे हटवण्यावर सहमती दर्शवली. पेट्रोल पॉईंट १४ ही तीच जागा आहे ज्यासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. याठिकाणी चिनी सैनिकांनी बंकर उभे केले, त्यानंतर रक्तरंजित संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. चीनने भारतीय सीमेत ८०० मीटर परिसरावर दावा केला होता हे आता स्पष्ट झालं आहे.
चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी सहमती झाली होती.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.
किमान या बातमीमुळे भारताला सावध राहण्याचा संदेश तरी मिळाला आहे. कारण यानंतर बरोबर ९१ दिवसांनी १९६२ चं युद्ध झालं होतं. ज्यात चीनने आपले सैन्य गलवान आणि बर्याच भागात पाठवले होते. १५ जूनच्या संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सैन्याच्या मदतीने परिस्थितीवर सतत नजर ठेवत आहेत, त्यानंतर परिस्थिती आता पुन्हा सावरताना दिसत आहे. सध्यातरी दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापित राहण्यासाठी सहमती दर्शवत एकमत करण्याच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.