India China Faceoff: चीनकडून पुन्हा भारताचा विश्वासघात?; सॅटेलाईट फोटोंनी टिपला ड्रॅगनचा कावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:08 PM2020-06-24T15:08:46+5:302020-06-24T15:13:33+5:30
India China Faceoff: भारत-चीनचं सैन्य आमनेसामने आलेल्या गलवानमध्ये ड्रॅगनच्या वेगवान हालचाली
बीजिंग: गेल्या आठवड्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्याची झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ ते ४० जवान मारले गेले. मात्र चीननं मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर परवा (२२ जून) भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानंतर चीननं सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रत्यक्षात चीनच्या वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून चीनचा कावेबाजपणा उघड झाला आहे.
गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या हालचाली उपग्रहांनी टिपल्या आहेत. त्यामधून चीनच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज येऊ लागला आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्स ऍनालिस्ट डेट्रेस्फानं गलवान खोऱ्यातील काही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. गेल्या आठवड्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झालेल्या ठिकाणाजवळ सध्या बंकर तयार करण्याचं काम सुरू असल्याचं छायाचित्रांमधून दिसत आहे. या भागात लहान लहान भिंती तयार करण्यात आल्या असून खोदकामही करण्यात आलं आहे. त्यामुळे चीनचा नेमका मानस काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतासोबत संवाद सुरू ठेवून गलवानमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.
Images via @Maxar of the #GalwanValley face-off point on 22 June 2020 show possible defensive positions being set up by #China, small walls, trench type areas have now appeared on site #IndiaChinaFaceOffpic.twitter.com/5PClz8qKEz
— d-atis☠️ (@detresfa_) June 24, 2020
डेट्रेस्फानं दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्यानं पँगाँग तलाव परिसरातही तळ ठोकला आहे. या भागातील चिनी सैन्याची संख्या वाढत जात आहे. पँगाँगच्या दक्षिणेला १९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य उपस्थित आहे. भारतासोबत निर्माण झालेला सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. परवा झालेल्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चीननं याचाच पुनरुच्चार केला. त्यांनी पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याचीही तयारी दर्शवली.
५ मेपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी ५ जूनला दोन्ही देशांच्या लष्कराच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये पहिल्यांदा बैठक झाली. या बैठकीतही चीननं पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र बैठकीतल्या निर्णयांची अंमलबजावणी होतेय की नाही, ते पाहण्यासाठी गेलेल्या भारतीय जवानांवर चिनी सैन्यानं हल्ला केला. त्याला भारतीय जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. मात्र चीननं मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही.
मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयार
चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली
जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार