India China FaceOff: चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:31 AM2020-09-02T07:31:22+5:302020-09-02T07:36:46+5:30

यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला.

India China FaceOff: China Tries To Cross LAC Again In Chumar, India Foils Attempt | India China FaceOff: चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

India China FaceOff: चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

Next
ठळक मुद्देमंगळवारी पुन्हा एकदा चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलाभारतीय लष्कराच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. चिनी सैनिकांची कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत

नवी दिल्ली – वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न वाढत आहेत. मंगळवारी ड्रॅगनने चुमारमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैनिकांना पाहून चिनी सैनिक तेथून पळून गेले. चिनी सैन्याच्या जवळपास ७ ते ८ वाहने चप्पूजी छावणी येथून भारतीय हद्दीच्या दिशेने येत होती. घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सुरक्षा दलानेही वाहने तैनात केली. चिनी सैनिकांची कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत.

यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळीही भारतीय सैनिकांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा नव्या ठिकाणी वाद सुरू झाला आहे. जिथे पूर्वी वाद होता त्या जागेवरुन आता हा वाद पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस सुरु झाला आहे.

चीनच्या या कुरापतींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला आहे, कारण चिनी सैन्याने २९-३० ऑगस्टच्या रात्रीनंतर सोमवारी रात्री पुन्हा भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावरील चर्चा होत आहे, परंतु त्यादरम्यान चिनी सैन्याने पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही राजनैतिक आणि लष्करी मार्गाने चीनकडे हा विषय उचलला आहे.

त्याचवेळी चीनकडून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोभाल, सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख उपस्थित होते. ही बैठक सुमारे दोन तास चालली.

चीनच्या कुरापतींची भारताला आधीच माहिती

भारतीय लष्कराला सीमेवरील चीनच्या कृत्यांविषयी आधीच माहिती होती. भारतीय सैन्याच्या स्पेशल ऑपरेशन्स युनिट, शीख लाईट इन्फंट्रीने २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चीनचा डाव उधळून लावला. गेल्या एका आठवड्यापासून भारताने सीमेवर अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र तैनात केले आहे, ज्याने चिनी प्रदेशावर लक्ष्य केले जाऊ शकते.

दरम्यान, लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारताने अतिरिक्त जवानांना तैनात केले आहे.

नेमके काय झाले?

पँगौंग सरोवरात स्वहद्दीत चिनी सैनिकांनी तळ ठोकला आहे. पूर्वस्थितीनुसार आपल्या क्षेत्रात नियंत्रणरेषेच्या कक्षेत थांबण्याची भारताची मागणी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारताने हीच मागणी कायम ठेवली. चीननेही वेळोवेळी त्यास सहमती दर्शवली. राजनैतिक, लष्कर, परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत मागे हटण्याची तयारी दाखवली. संपूर्णपणे स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय चर्चा निष्फळ ठरेल, असे भारताने वारंवार बजावले. २९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३० ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी बांधकाम आरंभले. साधारण ५०० सैनिक होते, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जवानांनी त्यास विरोध केला. शक्तिप्रदर्शन केले. शारीरिक इजा दोन्ही बाजूंनी कुणासही झाली नाही. जवानांनी मानवी भिंत तयार केली व युद्धस्थितीतील कवायती केल्याचा दावा सूत्रांनी केला. ड्रॅगनच्या कावेबाजपणाचा अंदाज असल्याने जवान सज्ज होते. त्यामुळे चिनी सैनिकांना मागे हटावे लागले.

भारताने गेल्या दोन महिन्यांमध्ये ड्रॅगनची दुखरी नस दाबली आहे. चिनी मालावर अप्रत्यक्ष बहिष्कार, शेजारील राष्ट्रांशी व्यापारविषयक करारावर निर्बंध लावताना भारताने चीनला वेळोवेळी समज दिली. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनला वेगवेगळ्या शब्दांत भारताचा इरादा सांगितला. चीनने आतापर्यंत वेळकाढूपणा कायम ठेवला आहे.

Web Title: India China FaceOff: China Tries To Cross LAC Again In Chumar, India Foils Attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.