India China FaceOff: लडाख सीमेवरून चीनच्या सैन्याची २ किलोमीटर माघार, ड्रॅगनचे मनसुबे उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:03 AM2020-07-09T05:03:39+5:302020-07-09T05:04:34+5:30
वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली.
नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सर्व वादग्रस्त ठिकाणांहून चर्चेत ठरल्याप्रमाणे चीन व भारताने आपापले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली व चिनी सैन्याने सुमारे दोन किमीपर्यंत माघार घेतली आहे, असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, ‘पॅट्रोलिंग पॉइंट १५’ (पीपी १५) येथून सैन्य मागे घेतल्यामुळे माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. हॉटस्प्रिंग व गोगरा याठिकाणी सैन्य माघारी घेणे सोमवारीच सुरू झाले होते.
सूत्रांनी असेही सांगितले की, सीमेवरील संघर्षांच्या ठिकाणी दोन्ही देशांची सैन्ये परस्परांना आक्रमक स्वरूपात भिडली होती. सैन्याची ती जमवाजमव दोन्ही बाजूंना एक ते दीड किलोमीटर मागे घ्यावी, असे सीमेवर झालेल्या उभय सैन्यांच्या वरिष्ठ कमांडरांच्या चर्चेत ठरले होते. माघारीचा हा टप्पा पूर्ण झाल्याने पुढील पावले आणखी चर्चेनंतर टाकली जातील.
सूत्रांनुसार चीनच्या माघारीवर भारतीय सैन्य सतत लक्ष ठेवून होते. ते समाधानकारक माघार घेत आहेत याची खात्री झाल्यावर भारतीय सैन्यानेही माघार घेण्यास सुरुवात केली व सीमेवरील सैन्य दीड किलोमीटर मागे घेतले. वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून झालेल्या दोन तासांच्या चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवरून असलेले मतभेद वादामध्ये रूपांतरित होऊ न देण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली होती, तसेच सीमेवर शांतता व सलोखा नांदावा यासाठी दोन्ही देशांनी ठरल्याप्रमाणे सैन्यमाघार लवकर पूर्ण करावी, असेही ठरले होते.
दक्षिण चीन समुद्रात मित्र राष्टÑांसोबत युद्धनौका सराव वाढणार
गलवान खोºयातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी भारतीय लष्करी गुप्तचर यंत्रणांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारताकडून मनुष्यबळ कमी करण्यात येणार असले तरी अत्याधुनिक रडार व क्षेपणास्त्र भेदक उपकरण त्याच ठिकाणी राहील.
एकीकडे चिनी राज्यकर्ते भारतासमवेतचा तणाव निवळला असल्याचे सांगत असले तरी चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्समधून मात्र भारतविरोधी कागाळ्या सुरूच आहेत. संपूर्ण खोºयावर दावा ठोकणाºया चीनला तूर्त नमावे लागले आहे.
आता भारताने दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्स, अमेरिका व जपानसमवेत युद्धनौकांचा सराव वाढवण्याचा प्रस्ताव उभय राष्ट्रांना दिला आहे. तसे झाल्यास एक प्रकारे चीनच्या विस्तारवादाला भारत नव्याने आव्हान देईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली. आॅगस्टपासून युद्धनौका सराव सुरू होणार आहे.
भारतीय जवानांच्या बलिदानामुळे चीनचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. दोन्ही देश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे सरकले असून, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. सॅटेलाईट इमेजनुसार चिनी सैनिक झटापट झाली त्या ठिकाणाहून दोन किमी मागे हटले आहेत.
दोन किमी बफर झोन, तर दोन किमी मागे, असे एकूण चार किमी चिनी सैनिक मागे हटले आहेत. पँगाँग लेक परिसर, फिंगर १५, ८ पासूनही चिनी सैनिक मागे सरकतील.
अजून तर सुरुवात
चीनसमवेत तणावास आता कुठे सुरुवात झाल्याचा दावा करून परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, डोकलामप्रमाणे भारताने आताही प्रश्न संयमाने हाताळला. चीनवर भरवसा ठेवता येणार नाही. लवकरच चीनकडून अरुणाचल प्रदेशचा सीमावाद उकरून काढला जाईल.
अर्थात, गलवाननंतर तशीच चीनची रणनिती होती; परंतु भारतीय जवानांनी गलवान खोºयात सडेतोड प्रत्युत्तर दिल्याने ड्रॅगन नरमला. चीन फार काळ शांत राहणार नाही. त्यासाठी अरुणाचल सीमावाद चिघळू नये यासाठी भारताकडून आंतरराष्ट्रीय समूहात आतापासूनच चर्चा सुरू केली जाणार आहे.